आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prof. Arun Ghodke Speech In Dhule On Shambhuraje

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शंभूराजांच्या चारित्र्याची इतिहासात चुकीची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - जाणता राजा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र शंभूराजे यांनी धर्मासाठी लढण्याचा आणि मरण्याचा मंत्र दिला. त्यांनी आपले आयुष्य त्यासाठी घालविले असताना त्यांच्या चारित्र्याबद्दल चुकीची माहिती दिली जाते. ते धर्मवीर राजे होते, असे विचार सातारा येथील प्रा. अरुण घोडके यांनी मांडले.

र्शी शिवाजी विद्याप्रसारक संस्थेतर्फे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त शहरातील गरुड मैदानावर दरवर्षी तीनदिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा. अरुण घोडके यांनी ‘असे होते शंभूराजे’ या विषयावर गुंफले. अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक डॉ. भाईदास पाटील हे होते. या वेळी सचिव उत्कर्ष पाटील यांच्या हस्ते घोडके यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून या व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. या वेळी अरुण घोडके यांनी शंभूचरित्र म्हणजे राष्ट्रजीवनाची पवित्र गाथा आहे. प्रखर देशाभिमानी, बलशाली युवा पिढी बनविण्याची शक्ती केवळ शंभूचरित्रातच आहे. केवळ कुण्या मल्हार चिटणिसाच्या बखरीमुळे शंभूराजाचे जीवनचरित्र बदनाम झाले आहे. शंभूराजे प्रेमवीर नव्हे तर धर्मवीर होते, असे सांगितले. मल्हार चिटणिसाचे खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस असताना संभाजी राजांनी दुसर्‍या कटाच्या वेळी त्यांना हत्तीच्या पायी तुडवून मारले होते. त्याचा राग राजांच्या मृत्यूनंतर 122 वर्षांनी म्हणजे इ.स. 1811मध्ये चिटणिसांनी बखर लिहून, त्यांना बदनाम करून काढला, असेही आपल्या व्याख्यानात सांगितले. संभाजीराजे बदफैली नव्हते तर संस्कारशील, शिवनीतीचा अवलंब करणारे शेतकर्‍यांचे कैवारी, 16व्या वर्षी शेतसारा माफ करणारे, विविध भाषा पारंगत बुद्धिमान राजा होते. त्यांनी बुद्धभूषण, नखाशीख, नायिकाभेद, सातसनक या चार ग्रंथांचे लेखन केले. असा राजा चारित्र्यहीन कसा असू शकतो?, त्यांनी पावणेनऊ वर्षांच्या काळात केलेल्या 128 लढायांमध्ये एकही हरले नाही. सर्व जिंकल्या. छत्रपतींच्या तालमीत घडलेले संभाजीराजे दसपट ताकदवान, बुद्धिमान होते. अशा सर्वगुणसंपन्न, सर्वधर्मसमावेशक, धोरणी राजाचा वध औरंगजेबाने तुळापूर वढू बुद्रुक येथे करून या क्रांतिकारी सूर्याचा अस्त केल्याचे आपल्या व्याख्यानात सांगितले. याप्रसंगी त्यांनी शंभूराजाच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकला. कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन कुणाल पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस. टी. पाटील, सचिव उत्कर्ष पाटील, प्रशासन अधिकारी प्रमोद पाटील, मधुकर गर्दे, इतर पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मराठा कोणाला म्हणावे?

मराठा कोणाला म्हणावे, याबाबत घोडके यांनी व्याख्यानात तीन गोष्टी सांगितल्या. त्यात महाराष्ट्रात जो राहतो तो मराठा. मराठी भाषेतून संभाषण करतो, बोलतो तो मराठा आणि ज्याला मराठीत स्वप्न पडतात तो मराठा, असे सांगितले. कोणाला इंग्रजी भाषेत किंवा इतर भाषेत स्वप्न पडतात का? असाही उपप्रश्न विचारून मराठा कोणाला म्हटले पाहिजे हे स्पष्ष्ट केले.