आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कान्हदेशच्या लोकधारेतून बहिणाईंच्या साहित्याचा केला प्रसार, प्रा.कमल पाटील यांचा एकपात्री प्रयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - सातपुड्याच्या कुशीतील वड्री (ता. यावल) येथील माहेर आणि भादली (ता. जळगाव) येथील सासर असलेल्या निवृत्त प्रा. कमल पाटील यांच्या विवाहानंतर १२ वर्षांतच पतीचे अकाली निधन झाले. या काळात त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या ‘माणूस’ आणि ‘खोप्यामंधी खोपा’ या कवितांनी जगण्याचे बळ दिले.
 
पुढे याच कविता आणि बहिणाबाईंचे साहित्य राज्यभरात पोहोचवण्यासाठी प्रा. पाटील यांनी पुढाकार घेतला. ‘कान्हदेशची लोकधारा’ आणि ‘मी बहिणाबाई बोलतेय’ या एकपात्री अंकाचे सव्वाशेपेक्षा अधिक प्रयोग करुन त्यांनी खान्देशातील साहित्य राज्यभरात पोहोचवले. 
 
जगजग माझा जीवा 
असं जगनं मोलाचं ।। 
उंच गगनासारखं 
धरित्रीच्या रे तोलाचं ।। 
बहिणाबाई चौधरींच्या या कवितेने प्रा.पाटील यांना पतीच्या निधनानंतर अवघ्या पाच वर्षांच्या मुलाचा सांभाळ करुन जगण्याचे बळ दिले. जळगावात एका कार्यक्रमात कवी ना. धो. महानोर यांच्या शेवंतीचा मळा या कार्यक्रमातून प्रेरणा घेत प्रा. पाटील यांना बहिणाईंच्या साहित्यावर प्रयोग सादर करण्याची संकल्पना सुचली. संगीत विशारद मुकेश खपली, शंभू गोडबोले, विजय नेरकर, सतीश सराफ यांनी दिलेल्या बळामुळे आणि ‘मी बहिणाबाई चौधरी बोलतेय’ या अडीच तासांच्या एकपात्री प्रयोगाची निर्मिती झाली. जळगाव, धुळे, नंदूरबारसह मराठवाडा आणि पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये ‘मी बहिणाबाई चौधरी बोलतेय’ या एकपात्री अंकाचे १२५ पेक्षा अधिक प्रयोग झाले. याच दरम्यान मुकेश खपली यांच्या ‘कान्हदेशची लोकधारा’या कार्यक्रमाच्या तब्बल १२ प्रयोगांतून प्रा. कमल पाटील यांनी बहिणाबाई साकारल्या. शहरातील नाहाटा महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर आता त्या पुण्यात मुलगा प्रशांत यांच्याकडे वास्तव्याला आहेत. 
 
विवाहानंतर घेतले शिक्षण : प्रा.पाटील यांनी अमरावती येथून डी. एड. केले. विवाहानंतर पती कै. अरुण पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे जळगावातून एम. ए. पदवी घेतली. पतीच्या निधनानंतर नाहाटात प्राध्यापिका म्हणून त्यांनी नोकरी केली. 
 
कान्हदेशची लोकधारायशस्वी : प्रा.पाटील यांनी १९८० पासून जळगाव आकाशवाणी केंद्रातून अनेक कार्यक्रम केले. व्याख्याने, कथाकथन, एकपात्री प्रयोग, निवेदन, मी बहिणाबाई बोलतेय, मी शामची आई बोलतेय आदी एकपात्री प्रयोगही केले. 
बातम्या आणखी आहेत...