आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्यापकांच्या आंदोलनाचा फटका भावी अभियंत्यांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - विविध मागण्यांसाठी 96 दिवसांपासून परीक्षा कामावर बहिष्कार टाकणार्‍या प्राध्यापकांच्या संपाचा पहिला फटका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. प्राध्यापकांनी ठरावीक मुदतीत उत्तरपत्रिकांची फेरतपासणी न केल्याने रिपीटर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शुल्क व वर्ष दोन्ही वाया गेल्याची प्रतिक्रिया येत आहेत.

अभियांत्रिकीच्या ‘ई अँड टीसी’ विभागाचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंजिनिअरिंग या विषयाचा मंगळवारी पेपर आहे. खान्देशातून सुमारे एक हजार विद्यार्थी हा पेपर देणार आहेत. त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या विषयात आपण उत्तीर्ण असल्याचा दावा करत फेरतपासणीसाठी शुल्क भरले होते. मात्र, प्राध्यापकांनी ठरावीक मुदतीत फेरतपासणी न केल्याने त्यांच्यावर पुन्हा परीक्षा देण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातूनही विद्यार्थ्यांना याबाबत सर्मपक उत्तर मिळालेले नाही.

दीड हजार रुपये खर्च

विद्यार्थ्यांनी अनुत्तीर्ण झालेल्या विषयाच्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स मिळवण्यासाठी 550 रुपये शुल्क भरले आहे. झेरॉक्स प्रतीची तपासणी केल्यानंतर ज्यांना उत्तीर्ण होण्याचा आत्मविश्वास होता त्यांनी पुन्हा 500 रुपये भरून फेरतपासणीसाठी अर्ज केला. मात्र, परीक्षेची तारीख जवळ येईपर्यंत फेरतपासणीचा निकाल न लागल्याने त्यांनी परीक्षा शुल्कही 500 रुपये भरले. दीड हजार रुपये खर्च करूनही विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची हमी देण्यात आलेली नाही. फेरतपासणीनंतर विद्यार्थी या विषयात उत्तीर्ण झाले तर दुसर्‍यांदा दिलेल्या पेपरचे काय? परीक्षा फी परत मिळेल काय किंवा या दोन परीक्षांमधील कोणता निकाल ग्राह्य धरण्यात येईल याची खात्री विद्यापीठाने दिलेली नाही. एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचा हा प्रकार सुरू झाला आहे.

विद्यापीठाकडून टोलवाटोलवी
विद्यार्थ्यांनी विद्यापीठात चौकशी करण्याचा प्रयत्न केला. महत्प्रयत्नानंतर त्यांना एका अधिकार्‍याशी संपर्क साधता आला. मात्र, त्यांनी दुसर्‍या नंबरवर फोन करण्यास सांगितले. दुसर्‍या फोनवरही तेच उत्तर मिळाले. या टोलवाटोलवीमुळे विद्यार्थ्यांना माहितीच मिळाली नाही. प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासल्या नाहीत आणि विद्यापीठाकडून सर्मपक उत्तर मिळत नाहीत, असा दुहेरी मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.