आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. अस्मिता पाटील यांना नोटीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नूतन मराठा महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापिका डॉ.अस्मिता पाटील यांना गैरहजेरीबद्दल संस्थेने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षाही आहेत.

मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्था गेल्या वर्षभरापासून प्रशासकाच्या नियंत्रणात असल्यामुळे तिथे बहुतांश नियमांचे काटेकोरपणे पालन होऊ लागले आहे. त्यातच महाविद्यालयात सुरू झालेल्या ‘थम्ब इम्प्रेशन’ प्रणालीमुळे प्राध्यापकांच्या हजेरीचे ‘सत्य’ समोर येत आहे. डॉ.अस्मिता पाटील यांची गैरहजेरीही त्यातून समोर आली होती. सहयोगी प्राध्यापिका म्हणून सेवेत असताना डॉ.पाटील सतत गैरहजर राहत असल्यामुळे त्यांच्यावर सोपवलेली अध्यापनाची जबाबदारी तासिका तत्त्वावरील व्यक्तींना पार पाडावी लागते, अशी त्यांच्याविरुद्ध तक्रार होती. त्यामुळे त्यांना यासंदर्भात ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस मिळाल्याचे डॉ.अस्मिता पाटील यांनीही मान्य केले आहे.

प्राचार्य बदलताच हालचाली
नूतन मराठा महाविद्यालयावर गेल्या वर्षी प्रशासकाची नियुक्ती झाली. त्यानंतर जानेवारीत प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांची बदली वरणगाव येथे करण्यात आली. त्यांच्या जागी वरणगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी.सुरवसे यांना नियुक्त करण्यात आले.

आगमनानंतर डॉ.सुरवसे यांनी शिस्तीच्या नियमांवर बोट ठेवले असून, डॉ.अस्मिता पाटील यांना लागलीच ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या कामासाठीच त्यांना महाविद्यालयात आणले गेले असावे, अशी चर्चा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात आहे.

महाविद्यालयातील कारभारात सुसूत्रता यावी या उद्देशाने कठोर निर्णय घेण्यात येत आहेत. त्यामुळे वेगवेगळय़ा कारणांवरून काही प्राध्यापकांना नोटीस बजावण्यात आली आहे. कारण नियमानुसार सर्वांनी काम करणे अपेक्षित असल्याचे महाविद्यालय प्रशासक डॉ. ए. बी. साळी यांनी सांगितले.