आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Property Tax Collection Issue In Jalgaon Corporation

मनपाचे १२ कोटी थकवणाऱ्या घरकुलधारकांकडे कानाडोळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - २० हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांच्या घरी पथक पाठवून जप्तीचा दम देणाऱ्या पालिका प्रशासनाचे १२ कोटी रुपये थकवणाऱ्या घरकुलधारकांकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष होत आहे.
पालिकादेखील आपल्या हक्काचा पैसा वसूल करण्यात रस दाखवत नाही. त्यामुळे घरकुलधारक पालिकेचे जावई आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या पालिकेला कर्जमुक्त करण्यासाठी सगळ्याच पातळ्यांवर प्रयत्न होताना दिसत आहेत. सर्वसामान्य जनतेलाही आता यातून मार्ग निघावा अशीच अपेक्षा आहे. थकबाकीदारांना पैसे भरण्याचे आवाहन करून पालिका जप्तीसारखी कारवाईला पुढे सरसावली आहे. एकीकडे बड्यांना दणका देताना मात्र कर्ज काढून घरकुल बांधून रहिवासाची सुविधा उपलब्ध करून दिलेल्या घरकुलधारकांकडून नाममात्र शुल्क वसुलीकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. शहरातील साडेचार हजार घरकुलधारकांकडील नाममात्र फी १२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

अशी आहे मागणी
>२०१२-२०१३पर्यंत- कोटी ३४ लाख ५५ हजार ३१२ थकबाकी
> २०१३-१४ या आर्थिक वर्षात ८२ लाख ८६ हजार ३८० अपेक्षित होते
> घरकुल रहिवाशांकडून ११ लाख ४२ हजार ५७४ वसूल

कायदेशीर बाबी तपासणार
^पालिकेच्या घरकुलांमध्ये राहणाऱ्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. कागदपत्रे कायदेशीर बाबी तपासून आगामी काळात निर्णय घेण्याचा प्रयत्न राहणार आहे. पालिकेचे घरकुलधारकांकडे बरीच थकबाकी आहे. बोगस रहिवाशांना कायम करून देण्याचा प्रयत्न आहे. प्रदीपजगताप, उपायुक्त
अनेकांनी बळकावली घरकुले
झोपडपट्टी मुक्त शहर व्हावे या उद्देशाने कर्ज काढून बांधलेल्या घरकुलातील मूळ मालक गायब असून त्यांच्या जागी बेकायदेशीर रहिवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रशासनाच्या सर्व्हेत शिवाजीनगरात ७२७ घरकुले आहेत. त्यातील २४६ घरकुले मूळ मालकांकडे आहे तर ३८२ घरकुल बळकावली आहेत. तपासणीदरम्यान ९९ घरकुले बंद होती. तसेच खेडी घरकुल योजनेत ८० घरे आहेत. त्यातील ३४ मूळ मालकांकडे तर २२ घरकुलांत बेकायदेशीर ताबा आहे. २४ घरकुले बंद होती.
कायदेशीर करून द्यावे...
शहरातील साडेचार हजार घरकुलांतील ५० घरांमध्ये आज मूळमालक राहत नाहीत. त्यामुळे ज्या लोकांनी ही घरकुले बळकावली आहेत. त्यांना पालिकेने रितसर फी आकारणी करून कायदेशीर कब्जा द्यावा. यातून सध्या रहिवास करणाऱ्यांचा निवाराही हिसकावला जाणार नाही पालिकेचे आर्थिक नुकसानही टळू शकेल अशी अपेक्षा आता घरकुलधारकच व्यक्त करू लागले आहेत. सद्या पालिका सर्वेक्षण करीत असून याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. कायमस्वरुपी ताबा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
केवळ घोषणा, कारवाई शून्य
थकबाकी वसुलीसाठी घरकुल परिसरात रिक्षेद्वारे जाहीर आवाहन करणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यास जप्तीची किंवा बेदखल करण्याची कारवाई करण्यात येणार होती. मात्र, पालिकेकडून एकही कारवाई होऊ शकलेली नाही. त्यामुळे प्रशासन केवळ घोषणा करते प्रत्यक्षात कारवाई शून्य आहे.