आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Proposal Of Solapur Municipal Corporation Asked By Jalgaon Municipal Corporation For City Bus Service

जळगाव शहर बससेवेसाठी सोलापूर महापालिकेतून मागविला प्रस्ताव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सोलापूर महापालिकेत केंद्राच्या योजनेतून शहर बस वाहतूक सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. मोठी आर्थिक गुंतवणूक न करता केंद्रांच्या माध्यमातून ही योजना राबविता येणे शक्य असल्याने पालिका प्रशासनातर्फे सोलापूर महापालिकेने तयार केलेल्या प्रस्तावाची माहिती मागविली आहे.

केंद्रातर्फे जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिनिवल मिशन योजनेअंतर्गत देशातील मोठय़ा शहरांमध्ये शहर बससेवेसाठी अनुदान देण्यात येते. दोन हजार बसवाटपाची ही योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारचे 80 तर राज्य शासनाकडून 20 टक्के अनुदान दिले जाते. सोलापूर महापालिकेने सादर केलेला 200 बसचा प्रस्ताव नुकताच मान्य होत 108 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. जळगाव महापालिका हद्दीत सुरू असलेल्या ‘जेएमटीयू’ची सेवा गुंडाळण्याच्या मार्गावर असल्याने पर्यायी योजनेचा शोध घेतला जात होता. सोलापूरप्रमाणे केंद्राच्या योजनेतून जळगाव महापालिकेला किमान 25 ते 50 बस उपलब्ध झाल्या तरी पुरेशा होणार आहे. गेल्या महिन्यातच केंद्रातर्फे सुरू करण्यात आलेली योजना 2014 मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी योजनेचा फायदा घेण्यासाठी प्रशासनातर्फे हालचाली सुरू झाल्या आहेत. सोलापूर पालिकेने कशा प्रकारे प्रस्ताव तयार केला होता. यासोबत कोणती कागदपत्रे जोडली होती. यासह तांत्रिक बाबींची माहिती घेतली जात असून ती प्राप्त झाल्यावर जळगाव पालिकादेखील प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे सादर करणार आहे.


प्रकल्पासाठी एजन्सीशी चर्चा
योजनेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी सोलापूर पालिकेसाठी काम केलेल्या एजन्सीला प्राथमिक चर्चेसाठी बोलावले आहे. आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर या संदर्भात निर्णय घेतला जाईल. सोलापूर महापालिकेकडूनही या संदर्भात माहिती मागविली आहे. योगेश बोरोले, प्रकल्प अभियंता