आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्काळजी डाॅक्टरांविरुद्ध गुन्हा नाेंदीसाठी कुटुंबीयांचा पाेलिस ठाण्यासमाेर ठिय्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अपघातानंतर उपचार करताना डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यामुळे तरुणीला दोन वर्षांत उजव्या पायावर वेगवेगळ्या आठ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. मात्र, तरीदेखील ती अद्याप पायावर उभी राहू शकली नाही. त्यामुळे या प्रकरणात डाॅक्टरांवर गुन्हा दाखल करून न्याय मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून तरुणीसह तिचे कुटुंबीय फिरत अाहेत. विशेष म्हणजे, या मुलीचे वडील पोलिस खात्यातच नाईकपदावर नोकरीला आहेत. मात्र, तरीदेखील त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे पोलिस कुटंुबीयांनी मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला; पण त्यांना आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही.
 
जिल्हा पोलिस दलाच्या तालुका पोलिस ठाण्यात अनिल राजाराम तायडे हे नाईकपदावर कार्यरत अाहेत. २९ जुलै २०१५ रोजी ते मुलगी ममता (वय १७) हिच्यासोबत दुचाकीने जात असताना महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या एका दुचाकीने त्यांना धडक दिली. यात बाप-लेक गंभीर जखमी झाले. दोघांनाही एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ममताच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी पायाला प्लॅस्टर बांधण्यात आले; परंतु चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या प्लॅस्टरचे विपरीत परिणाम झाले. तिच्या पायाला आतून सूज आली होती. त्यामुळे तीन दिवसांनंतर तिला नाशिक नंतर पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हापासून तिच्या पायावर वेगवेगळ्या प्रकारच्या आठ शस्त्रक्रिया झाल्या आहेत; परंतु अजूनही तिचा पाय पूर्ववत झालेला नाही.

त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून न्याय मिळावा, या मागणीसाठी तायडेंनी चार महिन्यांपूर्वी विशेष पोलिस महानिरीक्षक व्ही.के.चौबे यांची भेट घेतली. त्या वेळी चौबे यांनी आश्वासन दिले. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे मंगळवारी तायडे कुटुंबीय रामानंदनगर पोलिस ठाण्यात कैफियत मांडण्यासाठी आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. या वेळी पोलिस निरीक्षक बापूसाहेब रोहम यांनी त्यांची समजूत काढली. या प्रकरणाची जिल्हा शल्यचिकित्सकांकडे चाैकशी सुरू असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावरच गुन्हा दाखल करता येईल, अशी अडचण रोहम यांनी सांगितली. तसेच शल्यचिकित्सकांना भेटून लवकर अहवाल देण्याची विनंती करणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, दोन वर्षांपासून वेदना सहन करीत असलेल्या ममताला अद्यापही चालणे शक्य होत नाही.
 
ममताचा अपघात झाला त्या दिवशी तिच्या अकरावीच्या वर्गाचा पहिलाच दिवस होता. माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुढील उच्च शिक्षणाच्या उंबरठ्यावर पाय ठेवलेल्या ममताला कनिष्ठ महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी अपघाताला सामाेरे जावे लागले. मात्र, उच्च शिक्षणाचे स्वप्न रंगवणाऱ्या ममताला महाविद्यालय नव्हे, तर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये अॅडमिट व्हावे लागते. शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रियांनी ती त्रस्त झाली आहे. अकरावी बारावीची परीक्षा तिने बाहेरून दिली आहे. मात्र, या शिक्षणाचा काहीच उपयोग होत नसून, काॅलेजात नियमित जाऊन अभ्यास करायची तिची इच्छा आहे; परंतु ते सध्या शक्य नाही.
 
वैद्यकीय समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई
तायडेयांचे प्रकरण मागील महिन्यातच आपल्यापर्यंत आले. वैद्यकीय सेवा कायद्यानुसार उपचारात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा झाला किंवा चुकीचे उपचार केले याचा निर्णय जिल्हा वैद्यकीय समिती घेते. मी या प्रकरणात १० जून रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र देऊन समितीचा अहवाल मागितला आहे. अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त होताच संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल.
- बापूसाहेब रोहम, पोलिस निरीक्षक, रामानंदनगर पोलिस ठाणे
 
‘पप्पा, तुमच्या खात्यावर माझा विश्वास नाही’
अपघातानंतर उपचार चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे ममताचे वैयक्तिक शारीरिक नुकसान झाले आहे. अशा अवस्थेत असताना तिला समाज, प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा आहे. वडील पोलिस खात्यात असूनदेखील अद्यापही संबंधितांवर गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे ममतासह तायडे कुटंुबास मानसिक त्रास होतो आहे. त्यामुळे ममताने ‘पप्पा, माझा तुमच्या खात्यावर विश्वास राहिलेला नाही’ अशा भाषेत पोलिस प्रशासनाच्या विरोधात भावना व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...