धुळे- शहरासह जिल्ह्यातील मजूर, नोकरदार व्यावसायिकांनी चांगला परतावा मिळेल या अपेक्षेने मैत्रेयच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवले होतेेे; परंतु गुंतवणूकदारांना आता त्यांच्या ठेवी मिळत नसल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे मैत्रेय उपभोक्ता अभिकर्ता असोसिएशनतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या होत्या.
येथील पांझरा चौपाटीपासून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा लहान पूल, महाराणा प्रताप चाैक, महापालिका, झाशी राणी पुतळा, जुने प्रशासकीय संकुल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष प्रदीप सिसोदे, सचिव नीलेश वाणी, गौतम महाजन, मंगल परदेशी, सदस्य अशोक चौधरी, पांडुरंग बंडगर, बाबूराव घुले, सुभाष पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सतीश पाटील, चतुर देसले, सुरेश सपकाळे, राजेंद्र सुतार, महेंद्र जैन, सुभाष सोनगिरे, सुनीता वानखेडे, विनायक चव्हाण, दत्तात्रय शिंगाडे, राजेंद्र चित्ते, सचिन अमृतकर आदी सहभागी झाले. या आंदोलनांतर्गत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
त्यात म्हटले आहे की, मैत्रेय उद्योग परिवाराच्या मैत्रेय सर्व्हिसेस प्रा. लि., मैत्रेय प्लॉटर्स अॅण्ड कन्स्ट्रक्शन, मैत्रेय रिअल्टर अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा.लि., मैत्री सुवर्णसिद्धी प्रा.लि.च्या विविध कंपन्यांमध्ये जिल्ह्यातून तब्बल ३२५ कोटी रुपयांची गंुतवणूक झाली आहे. मजूर, नोकरदार, व्यावसायिक सर्वांनीच या कंपनीत चांगल्या परताव्याच्या आशेने पैसे गुंतवले आहेत. अनेकांनी एजंटच्या माध्यमातून कंपनीत ठेवी ठेवल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मैत्रेय कंपनी डबघाईस गेल्यामुळे आता गुंवणूकदार पैशांसाठी एजंटकडे चकरा मारत आहेत. एजंटांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी हातात विविध घोषवाक्य असलेले बॅनर घेतले होते.
महिला एजंट गुंतवणूकदार व्यथित
मैत्रेय कंपनीचे शहरासह जिल्ह्यात अनेक एजंट होते. त्यात घरकाम करणाऱ्या महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. महिला एजंटांच्या माध्यमातून अनेक गृहिणी तसेच नोकरदार महिलांनी गुंतवणूक केली. आता कंपनी अडचणीत सापडल्यानंतर एजंटांसह गुंतवणूकदार महिला व्यथित झाल्या आहेत.
कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करा
मैत्रेयच्या चारही कंपन्यांची राज्यासह देशभरात मालमत्ता आहे. ही मालमत्ता शासनाने जाहीर करावी. तसेच या मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांना पैसे देण्यात यावे, अशी मागणी आंदाेलनाद्वारे करण्यात आली. कंपनीच्या अघोषित मालमत्तांचाही शोध घेण्यात यावा. तसेच कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांसमोर येऊन सत्य परिस्थिती मांडावी, नाशिक येथील सरकारवाडा पोलिस ठाणे सेबीने बहुतांश मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्या विषयी निर्णय घ्यावा, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली.
१८ महिन्यांपासून परतावा नाही
गेल्या१८ महिन्यांपासून कंपनीकडून गुंतवणूकदारांना कोणताही परतावा देण्यात आलेला नाही. या विषयी २० जूनला प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते; परंतु प्रशासनाने या निवेदनाची दखल घेतलेली नाही. मैत्रेय कंपनीचे व्यवहार फेब्रुवारी २०१५ पासून बंद आहेत. तेव्हापासून ग्राहकांना परतावा मिळालेला नाही. कंपनीचा सर्व डाटा, माहिती, सर्व्हर नाशिक येथील सरकारवाडा पोलिस ठाण्यात जमा आहे. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यात याव्या अन्यथा आंदोलन करण्यात, येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.