आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेरात ‘तहसील’ला ठोकले कुलूप!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - शासकीय मदतीपासून वंचित राहिलेल्या गारपीटग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी मंगळवारी दुपारी आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जामनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, या वेळी मोर्चेक-यांना संबंधितांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तहसील व कृषी कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले. याप्रकरणी दोषी कर्मचा-यांवर कारवाई करण्याची मागणी करीत आमदार महाजन यांनी तहसील कार्यालयासमोर तीन तास ठिय्या आंदोलन केले. तसेच या वेळी एका संतप्त शेतकरी महिलेने तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्या श्रीमुखात लगावल्या. दरम्यान, सध्या विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशाचा काळ असल्याने दाखल्यांचा खोळंबा होऊ नये व विद्यार्थी अडचणीत येऊ नये म्हणून तीन तासांनंतर तहसील कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले.

परस्पर पंचनामे केल्याचा आरोप : मोजक्या शेतक-यांना सोबत घेत कृषी सहायकांनी मोठ्या शेतक-यांच्या घरी किंवा ढाब्यावर बसून गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले. तसेच तलाठी व कृषी विभागाच्या कर्मचा-यांनी पंचनामे करण्यासाठी पैसे घेतले व ज्या शेतक-यांनी पैसे दिले त्यांनाच शासकीय आर्थिक मदत मिळाली. ज्यांच्या नावावर शेती नाही किंवा अनेक वर्षांपासून ज्यांची जमीन पडीक आहे, अशा शेतक-यांना बागायत क्षेत्र म्हणून मदत मिळाली. प्रत्यक्षात मात्र ज्यांचे खरोखर नुकसान झाले आहे, अशा असंख्य शेतक-यांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागल्याचा आरोप शेतक-यांनी केला. या वेळी पूर्वसूचना देऊनही पंचनामे करणारे कृषी सहायक व तलाठी या वेळी उपस्थित न राहिल्याने आमदार महाजन यांनी संताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे संबंधित अधिका-यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाला कुलूप ठोकले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून टाकला होता. नुकसान होऊनही शेतक-यांना शासकीय लाभापासून वंचित ठेवणा-या कृषी विभागाच्या कर्मचा-यांना निलंबित करा, या मागणीसाठी आमदार महाजन यांनी शेतक-यांसह तहसीलसमोर तीन तास ठिय्या मांडला.

उतारे जाळून निषेध : बागायत किंवा दुबार पेरणी केलेली असून, सातबारा उता-यावर तशी नोंदही आहे. तसेच गारपीटनंतर कृषी विभाग व महसूल कर्मचा-यांनी पंचनामे केले. त्यामुळे मदत जाहीर झालेल्या नावांच्या याद्यांमध्ये नावे नसलेल्या बहुसंख्य शेतक-यांनी गेल्या पाच महिन्यांपासून तहसील कार्यालय व कृषी विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले. मात्र, त्यानंतरही मदत मिळाली नसल्याने संतप्त शेतक-यांनी मंगळवारी आंदोलनादरम्यान उतारे जाळून प्रशासनाचा निषेध केला.
कृषी अधिका-यास मारहाण
तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव हे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे याबाबतच्या आर्थिक व्यवहारात जाधव हेही सहभागी असल्याचा आरोप करून काही शेतक-यांनी त्यांना धक्काबुक्की केली, तर एका संतप्त महिलेने जाधव यांच्या श्रीमुखात लगावल्या. संतप्त जमाव पाहून पोलिस निरीक्षक रफिक शेख यांनी जाधव यांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पंचायत समिती सभापती सरिता भन्साली, उपसभापती नवलसिंग पाटील, नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते महेंद्र बाविस्कर, तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रकांत बाविस्कर, जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, रवींद्र भन्साली, अरविंद देशमुख, माजी सभापती बाबुराव घोंगडे, चंद्रशेखर काळे आदी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- पंचनामे होऊनही मदत न मिळालेले असंख्य शेतकरी दररोज माझ्याकडे यायचे. याबाबत तहसीलदार व कृषी अधिका-यांशी वारंवार बोललो. तसेच फेरपंचनामे करून मदत देण्याबाबत सूचनाही केल्या. मात्र, यंत्रणेकडून केवळ होकार मिळत राहिला; प्रत्यक्षात तक्रारदार शेतक-यांना मदत मिळालीच नाही. त्यामुळे संबंधित कर्मचा-यांच्या निलंबनाची मागणी केली असून, याप्रकरणी कारवाई न झाल्यास चार दिवसांनी कृषी विभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. गिरीश महाजन, आमदार, जामनेर