आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिओ लसीकरण; भुसावळ तालुक्यात 163 केंद्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना येत्या रविवारी पोलिओ डोस पाजला जाणार आहे. शहरासह तालुक्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून 162 केंद्र उभारले जाणार आहेत. मोहिमेत आरोग्य विभागाच्या 584 कर्मचार्‍यांचा सहभाग राहील.

देशातून पोलिओच्या उच्चाटनासाठी दरवर्षी ही मोहीम राबवली जाते. यंदाही शहर आणि तालुक्यात 19 जानेवारीला पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे. शहरातील 23 हजार 819 तर तालुक्यातील 40 हजार 603 बालकांचा यात समावेश असणार आहे. पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागांत 79 केंद्र उभारण्यात आले आहेत. रेल्वे स्थानक, बसस्थानक, महामार्ग आणि वर्दळीच्या भागाचा त्यात समावेश करण्यात आला आहे. आरोग्य विभागाची 21 पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात 325 कर्मचारी, 18 पर्यवेक्षक आणि 5 वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश असणार आहे. तसेच तीन मोबाइल पथकाद्वारे लहान बालकांना पोलिओ लस देण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन केले आहे.

सामाजिक संस्थांचा सहभाग
पोलिओ निर्मूलनासाठी आरोग्य विभागाला अंगणवाडी सेविका, मदतनिस, गृहरक्षक दलाचे कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थिनींचे सहकार्य मिळणार आहे. तसेच अनेक सेवाभावी संस्थांकडून जनजागृतीवर भर दिला जात आहे.

पाच दिवस फिरणार पथक
पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. मोहिमेंतर्गत रविवारी पोलिओ लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना मंगळवारपासून सतत पाच दिवस नियुक्त पथक शहर आणि ग्रामीण भागात घरोघरी जाऊन पोलिओ लसीकरण देणार आहेत.

तालुक्यात 84 केंद्र
तालुक्यात ग्रामीण भागातील लहान बालकांना पोलिओची लस देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विविध भागात पोलिओ लसीकरणाचे 84 बूथ लावले जाणार आहेत. यासाठी 234 कर्मचारी आणि 22 पर्यवेक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.

मोहिमेचे नियोजन पूर्ण
शहरात बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करण्यासाठी पालिका रुग्णालयाचे पथक सज्ज आहे. नागरिकांनी स्वत: सजग राहून मोहिमेचा लाभ घ्यावा. नवजात बालकांनाही पोलिओची लस दिली जाणार आहे. डॉ. कीर्ती फलटणकर, महिला वैद्यकीय अधिकारी, नगरपालिका रुग्णालय, भुसावळ