आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद : सभेला उशिरा आल्याने शिक्षणाधिका-यांना उभे राहण्याची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेला उशिरा आल्याने शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांना काही वेळ सभागृहात उभे राहण्याची शिक्षा करण्यात आली. शिक्षणधिकारी कदम सभेला अनुपस्थित राहात असल्याने सर्वच सदस्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली.
येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी दुपारी स्थायी समितीची सभा झाली.
अध्यक्षा सरलाबाई पाटील अध्यक्षस्थानी होत्या. उपाध्यक्ष शिवाजी दहिते, आरोग्य व शिक्षण सभापती मधुकर गर्दे, कृषी सभापती किरण पाटील, महिला व बालकल्याण सभापती ललिता देसले, समाज कल्याण सभापती शांताराम राजपूत, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. नेमाणे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, सदस्य विलास बिरारीस, उत्तमराव देसले, दत्तू गुलाब पाडवी, ज्ञानेश्वर एखंडे, कामराज निकम आदी उपस्थित होते. सभेत पाच विषयांवर चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे सदस्य कामराज निकम यांनी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी केली. त्यावर याविषयाकडे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी सूचना उपाध्यक्ष शिवाजी दहिते यांनी केली.
सभा सुरू झाल्यावर अर्धा तासाने शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम सभागृहात दाखल झाले. त्यामुळे अध्यक्षा सरला पाटील व उपाध्यक्ष शिवाजी दहिते यांनी त्यांना सभागृहात येण्यास मज्जाव करत जागेवरच थांबण्याची सूचना केली. काही वेळ ते सभागृहात उभेच होते. त्यानंतर त्यांना सभेला येण्यास उशीर का झाला याचे कारण विचारण्यात आले. त्यावर शिक्षणाधिकारी कदम यांनी शिंदखेडा येथे बैठकीसाठी गेलो असल्याने उशीर झाल्याचे कारण सांगितले. एरवीही शिक्षणाधिकारी कदम सभेला अनुपस्थित राहात असल्याने सदस्यांनी रोष व्यक्त केला. शिक्षणाधिका-यांना सभेपेक्षा इतर कार्यक्रम, बैठका महत्त्वाच्या असतात का असा प्रश्न या वेळी सदस्यांनी उपस्थित केला. यापुढे सभेला वेळेवर यावे अशी सूचना करत त्यांना सभागृहात बसण्याची परवानी देण्यात आली. सभेत जिल्हा ग्रामविकास निधी बचत खात्यात जमा झालेल्या रकमेतून एक कोटी रुपये स्टेट बँकेत ठेवण्यास मंजुरी देण्यात आली.

अध्यक्षा झाल्या बोलत्या
पदभार स्वीकारल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी अध्यक्षा सरला पाटील सभेत बोलत्या झाल्या. त्यांनी शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील स्वच्छतेच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. पाणी पुरवठ्याच्या विषयावर मत मांडले.त्यावर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांनी माहिती घेऊन सांगतो असे उत्तर दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. विषयाची माहिती नसेल तर सभेला येतातच का असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ग्रामपंचायत विभागावर ताशेरे
सभेत आरोग्य व स्वच्छतेच्या विषयावर चर्चा झाली. सत्ताधा-यासह विरोधकांनी स्वच्छतेच्या मुद्यावर ग्रामपंचायत विभागाच्या अधिका-यांना धारेवर धरले. स्वच्छतेअभावी गावात साथीच्या आजाराचे प्रमाण वाढलेले असतांना ग्रामपंचायत विभाग हातावर हात ठेवून बसत असल्याचा आरोप सभेत करण्यात आला.