आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Purushottam, Rajaram Dhake, Latest News In Divya Marathi

आजोबाला लागलाय कराट्याचा नाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- वयाची पासष्टी पार केल्यानंतर अनेक जण घरीच आराम करणे पसंत करतात. मात्र, मनी इच्छा असली तर या वयातही कोणतेच काम अवघड नाही, हे सिद्ध केले आहे वाघ नगरातील पुरुषोत्तम राजाराम ढाके यांनी. गेल्या 20 वर्षांपासून नियमित पंढरपूरवारीला जाणार्‍या ढाके यांनी यंदाही वारीला जाण्याचा निर्धार केला. मात्र, यात कोणतीही शारीरिक व्याधीची समस्या उदभवू नये, म्हणून फिट राहण्यासाठी त्यांनी चक्क कराटे शिकण्यास सुरुवात केली आहे. महिनाभरापासून ते पोलिस मुख्यालयातील कराटे क्लासमध्ये सराव करत आहेत.
मूळचे खेडी (खुर्द) येथील शेतकरी पुरुषोत्तम ढाके सध्या वाघनगरात त्यांच्या भाचीकडे राहतात. वारकरी संप्रदायाचे असलेले ढाके 20 वर्षांपासून नियमित पंढरपूरला पायी वारीला जातात. वयाची पासष्टी गाठली असली तरी अजूनही त्यांच्यात वीस वर्षाच्या तरुणासारखा उत्साह दिसून येतो. आपले शरीर तंदुरूस्त राहावे आणि यंदाची 21 वी वारी करता यावी, म्हणून नेमके काय करता येईल याचा ते विचार करीत रोज शहरात फेरफटका मारत होते. एके दिवशी त्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ लहान मुले कराटेचा सराव करताना दिसले. ते पाहून त्यांनाही कराटे शिकण्याची इच्छा झाली. याविषयी त्यांनी कराटेचे मार्गदर्शक विनोद अहिरे यांच्याशी चर्चा केली. मात्र, वय जास्त असल्याने सुरुवातीला त्यांनीही नकार दिला. मात्र, ढाके यांनी हट्ट केल्यानंतर त्यांचाही नाईलाज झाला. गेल्या महिनाभरापासून ढाके यांनी दररोज सायंकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान कराटेचा सराव सुरू केला आहे.

वयाच्या पासष्टीतही विशीचा उत्साह

वय झाल्यानंतर शरीरातील हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे डॉक्टर प्रत्येकाला जपून काम करण्याचा सल्ला देतात. इतकेच काय तर जास्त चालण्यासही बंदी घालतात. ढाके यांचे मात्र त्याच्या उलट आहे. 20 वर्षाच्या युवकाला लाजवेल असा त्यांचा उत्साह बघून अनेक युवकांचे ते महिनाभरात प्रेरणास्थान झाले आहेत. ढाके यांचे शिक्षण जुनी मॅट्रिकपर्यंत झाले आहे. खेडी खुर्द येथे ते शेतीकाम करत होते. वय झाल्याने गावात त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही, म्हणून ते सध्या जळगावात भाचीकडे राहतात.