आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद भाजपत अन‌् कामेही त्यांच्याच वॉर्डांत अधिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २५ कोटींच्या निधीवरून चार महिन्यांपासून सुरू असलेले चर्चेचे गुऱ्हाळ थांबायचे नाव घेत नाही. वारंवार यादी आणि त्याला मंजुरी, असे चक्र सुरू झाले आहे. ८४ कामांच्या यादीत टाळल्याच्या कारणावरून जोरदार राजकारण सुरू झाले आहे. सोमवारी झालेल्या भाजप नगरसेवकांच्या बैठकीत नव्याने कामांची यादी तयार करून ती आयुक्तांसह पालकमंत्र्यांकडे देण्याचा निर्णय झाला. विशेष म्हणजे नगरसेवक तक्रारी करीत असले तरी भाजपच्याच १५ नगरसेवकांच्या प्रभागात सर्वाधिक कामे मंजूर आहेत.

चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात २५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जळगावकरांना हायसे वाटले खरे; परंतु राजकारण्यांनी केलेली घोषणा ही आश्वासनांच्या खैरातीपेक्षा वेगळी काहीच नसल्याचा अनुभव नागरिकांना आता येत आहे. निधी येण्यापूर्वीच त्यावरून जोरदार राजकारण पेटले आहे. चार महिन्यांत आतापर्यंत केवळ कामांची यादी पूर्ण होऊ शकली. तर त्यातही भाजपच्या नगरसेवकांना स्थान नसल्याचा आरोप होत आहे. १२ मीटरपेक्षा जास्त रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय झालेला असतानात्यापेक्षा लहान रस्त्यांचाही समावेश यादीत असल्याने आमच्याही वॉर्डातील कामे समाविष्ट करा, या मागणीसाठी भाजप नगरसेवकांनी पालकमंत्री खडसेंची भेट घेतली.

नगरसेवकांच्याअपेक्षा उंचावल्या
२५ कोटींच्या निधीशी आमदार, खासदारांचा समावेश नसून कोणती कामे करायची? हा निर्णय आपण स्वत: घेणार असल्याचे खडसेंनी नगरसेवकांना सांगितले. त्यामुळे भाजप नगरसेवकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सोमवारी विरोधी पक्षनेते वामनराव खडके गटनेते डॉ. अश्विन सोनवणेंच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. यात नगरसेवकांनी ८४ कामांच्या यादीतील कामांसह अन्य कामांचाही समावेश करून स्वतंत्र प्रस्ताव देण्याचा निर्णय घेण्यात आला.

विशेष निधीसाठी दिला प्रस्ताव
महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारी प्रस्ताव पाठवून ८४ कामांसाठी विशेष निधी मिळण्याबाबत विनंती केली आहे. शहरातील प्राथमिक सुविधांची कामे करण्यासाठी शासनाकडून विशेष अनुदानाची मागणी मनपातर्फे करण्यात आली आहे. या प्रस्तावात ८४ प्रमुख रस्त्यांची यादी देण्यात आली असून यासाठी २५ काेटी १० लाख ७४ हजार ४०१ रुपये खर्च येणार आहे. शहर अभियंत्यांनी यास तांत्रिक मान्यता दिली आहे. या कामांसाठी शासनामार्फत अनुदान मिळावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिफारस करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असेही पत्रात म्हटले आहे.

भाजपमध्येच मतभिन्नता
८४ कामांच्या यादीत आमचीही कामे समाविष्ट करा, यावरून सुरू झालेले राजकारण पाहता भाजपमध्येच मतभिन्नता पाहायला मिळत आहे. भाजपचे काही नगरसेवक हे ८४ कामांच्या यादीला सहमती दर्शवतात तर काहींचा विरोध आहे. त्यामुळे भाजपमध्येच यादी वाढवण्यावरून दोन गट असल्याचे स्पष्ट जाणवतेय.

नेत्यांवरच अविश्वास
आमदार सुरेश भोळेंनी सुचवल्यानंतर कामांची यादी अंतिम करण्यात आली. सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या चर्चेअंती निर्णय झाला. विशेष म्हणजे, ८४ कामांपैकी सर्वाधिक कामे ही भाजपच्या ताब्यातील प्रभागांमध्ये आहेत. तरीही वाद सुरू आहे. यावरून भाजप नगरसेवकांचा आपल्याच नेत्यांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट दिसते. नितीन बरडे, सभापती, स्थायी समिती