आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आरआर’च्या शिक्षकांना सफाईची कामे; संस्थाचालकांविरुद्ध तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - इस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष आणि आर.आर.विद्यालयाच्या शालेय समितीचे चेअरमन अरविंद लाठी यांच्याविरोधात मुख्याध्यापकांसह शाळेतील शिक्षक,शिक्षकेतर अशा एकूण ६८ कर्मचाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली अाहे. संस्थाध्यक्ष लाठी यांची हुकूमशाही, शिक्षकांकडून वेठबिगारासारखे कामे करवून घेण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, संस्थाध्यक्ष लाठी यांनी सर्व आरोप फेटाळले असून व्यक्तिगत आकसापाेटी हे आरोप करण्यात आल्याचा दावा केला आहे. दरम्यान,शिक्षकांच्या तक्रारीचे निवेदन मिळताच शिक्षणाधिकारी कार्यालयाने द्वि- सदस्यीय समितीव्दारे चौकशी सुरू केली असून सात दिवसांत समितीचा अहवाल येईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. आर.आर.विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या बंडाच्या पावित्र्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली एकजूट होऊन या शिक्षकांनी लाठी यांच्या हुकूमशाहीविरोधात मुख्यमंत्र्यांसोबतच शिक्षणमंत्री,शिक्षणाधिकारी,जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडेही लेखी तक्रार केली आहे. सन २००१ पासून अरविंद बंकटलाल लाठी हे संस्थाध्यक्ष अाहेत. तेंव्हापासून त्यांनी कर्मचाऱ्यांवर दादागिरी सुरू केली असून ते शिक्षकांना नेहमी अपमानास्पद वागणूक देतात. शासकीय आदेशांचे उल्लंघन करणे मुख्याध्यापकांच्या कामात हस्तक्षेप करून शिक्षकांचा मानसिक छळ करीत आहेत. आर्थिक व्यवहार स्वत:कडे ठेवण्यासाठी मुख्याध्यापकांनाही काही अधिकार ठेवलेेले नाही. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून खासगी कामे करून घेतली जातात. सुटीच्या दिवशी शालेय समित्यांच्या सभा ठेऊन मानसिक छळ केला जात आहे. इतर शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता डावलून प्रतिभा पाटील यांची नियमबाह्य नेमणूक केली होती. लाठी यांच्या हेकेखोरपणामुळे विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजनाचा लाभ दिला जात नाही. शिक्षकांकडून शाैचालय साफ करण्याची कामे करून घेतली जात आहेत. यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांसह कुटंुबीय मानसिक तणावात आहेत. वेतनवाढ रोखणे, कार्यक्रमांच्या वेळी शिक्षकांना अमानुष वागणूक देणे, सुटीच्या दिवशी शाळेच्या परिसरात वराह घुसल्यामुळे शिक्षकांना मेमो देणे, कारकुनांना इतर कामांमध्ये गुंतवून ठेवणे, बांधकामाच्या वेळी वेठबिगारीसारखी कामे करून घेणे, अशा अनेक समस्या तक्रारी अर्जातून मांडण्यात अाल्या अाहेत. या तक्रारी अर्जावर मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपशिक्षक, कार्यालय अधीक्षक, लिपिक, ग्रंथपाल शिपाई अशा एकूण ६८ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही गुन्ह्यात अडकवून टाकण्याची धमकी
कायदा माझ्या बाजूने आहे, पोलिस विभाग माझ्या खिशात आहे. कोणत्याही गुन्ह्यात अडकवून सस्पेंड करेल, मी कुठेच अडकणार नाही, तुमचा मुख्याध्यापक अडकणार आहे. अशा भाषेत लाठी धमकावतात. आपल्या पूर्वाश्रमीच्या भाईगिरीचे दाखले देतात. मारामारी, खंडणी वसुली, प्राणघातक हल्ले करणे, अशा प्रकारच्या बाबी शिक्षकांना सांगून भीती निर्माण करतात, असेही निवेदनात नमूद केले आहे.

चौकशी करून संस्थेवर त्वरित प्रशासकाची नेमणूक करा
^शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जाईल. जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ आर.आर. शाळेच्या शिक्षकांच्या सोबत आहे. संस्थेची सखोल चौकशी करण्याची मागणी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. शिक्षकांवरील अन्यायाच्या निषेधार्थ संस्थेच्या विरोधात शनिवार,१७ सप्टेंबर रोजी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे. चौकशी करून या संस्थेवर त्वरित प्रशासक बसवण्यात यावा, अशी मागणी अाम्ही करणार अाहाेत. मागणी पूर्ण होईपर्यंत आणि पीडित शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल. एस.डी.भिरुड,सचिव, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ

आरोप करण्यापेक्षा पुरावे द्यावे
^मुख्याध्यापक, शिक्षकांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे. गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळेत तपासणी केली. त्यांनी १९ प्रकारच्या चुका निदर्शनास आणून दिल्या. या चुका सुधारण्यासाठी मी मुख्याध्यापकांना पत्र दिले आहे. त्या पत्रानुसार कार्यवाही होत नाही. त्यामुळे मी पुन्हा-पुन्हा मुख्याध्यापकांना पत्र देतो आहे. मुख्याध्यापक नियम माेडून भुसावळ येथून ये-जा करतात. विविध सुधारणांसाठी मी मुख्याध्यापकांना वर्षभरात सुमारे ३०० पत्र दिले आहेत. शाळेचे कामकाज चांगले होत नसल्यामुळे मी हे करीत आहे. त्याचा व्यक्तिगत आकस ठेऊन मुख्याध्यापक शिक्षक माझ्या विरोधात आरोप करीत आहे. त्यांनी पुरावे दिले पाहिजे. मुख्याध्यपकांनीच शिक्षकांना फूस लावली आहे. अरविंदलाठी, संस्थाध्यक्ष

चौकशीसाठी पथक नेमले
^लाठीयांच्या विरोधातील तक्रार अर्ज मिळाला आहे. त्यावर चौकशी करण्यासाठी दोन उपशिक्षणाधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे. सात दिवसांत समिती अहवाल सादर करणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. देविदास महाजन, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
बातम्या आणखी आहेत...