आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • R R Patil And Gopinath Munde Comment On Suresh Jain At Jalgaon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात ‘दादा’गिरीला विरोध; आबा, मुंडेंनी घेतला घरकुलातील आरोपींचा समाचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेल्या 30 वर्षांपासून एकहाती सत्ता असलेली महापालिका काबीज करण्यासाठी मतदारांच्या दरबारात आलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे व राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी वेगवेगळ्या जाहीर सभांच्या माध्यमातून शिवसेनेचे आमदार व घरकुलातील आरोपी सुरेश जैन यांच्याविरोधात टीकेची झोड उठवत जोरदार आव्हान दिले. या दोन्ही नेत्यांनी जळगावकरांना साद घालत विकासाचे आश्वासनही दिले. या नेत्यांनी भाषणातून अनेकविध घणाघाती आरोपही केले.

अपक्षांना मत देण्याचे पाप करू नका : पाटील
राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मते दिले नाहीत तरी चालतील परंतु अपक्षांना पवित्र मत देण्याचे पाप मुळीच करू नका. अपक्षांमुळे आयाराम-गयाराम संस्कृती वाढून सत्तेचे बाजारीकरण होते. बंडखोर लोक पक्षाशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत तसेच ते जनतेशी देखील इमान राखू शकत नसल्याचे मत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी व्यक्त केले. महापालिका निवडणुकीत प्रचार सभेत आर.आर.पाटील यांनी सर्वच पक्षांवर टीकेची झोड उठवली. अपक्षांवरून विषय सुरू करत शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस, खाविआ आणि सोबतच स्वपक्षातील काही विरोधकांचाही समाचार घेतला. टीकेची झोड उठतिाना आर.आर.पाटील यांनी त्यांचे मित्र असलेल्या विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे विरोधा एक शब्द देखील काढला नाही.

गृहमंत्री काय बोलले सभेत
> पैशाच्या बाजाराला बळी पडाल तर रामराज्य कधीच येणार नाही. अपक्षांमुळे भ्रष्टाचार वाढतो, सत्ता दुबळी होते.
> शिवसेना जळगावच्या निवडणुकीत कोठेच नाही. ओढा नदीला आणि नदी समुद्राला मिळते परंतु शिवसेनेचे आमदार असूनही शिवसेनारूपी नदी खाविआच्या ओढ्याला मिळाली.
> राष्ट्रवादीने चुकून गुन्हेगार, बदमाश, त्रासदायक उमेदवार दिले असतील तर त्यांना निवडणुकीत पाडा. निवडणुकीपूर्वी सायकल आणि आता आलिशान गाडीत फिरणाºया किमयागारांपासून सावध रहा.
> केळीसाठी प्रसिद्ध असलेले जळगाव आता घोटाळेबाज नेत्यांसाठी प्रसिद्ध आहे. आमच्याकडे आमदार मुंबईत, खासदार दिल्लीत असल्याचे आम्ही अभिमानाने सांगतो; जळगावचे लोक काय सांगतील, आमचे लोकप्रतिनिधी जेलमध्ये?
> भाजपचे दोन खासदार प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेताना पकडले गेले. दंगली, जातीय तेढ भाजपमुळे निर्माण होते. शिवसेना-भाजप सर्वत्र एकत्र आहेत. पालिकेतही ते एकत्र आहेत. मात्र, दाखवायचे दात वेगळे आहेत.
> शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे थोरला भाऊ म्हणून गुप्तपणे लढतो, मनसेचा धाकटा थोडा समोर येऊन तर एक भाऊ आतून (तुरुंगातून) लढत आहे.
> काँग्रेसवर बोलावे एवढी त्यांची ताकद नसल्याने त्यांना महत्त्व देण्याची गरज वाटत नाही. सोबत आले असते तर घेतले असते; आले नाहीत तरी जाऊ द्या, आमचेच काही त्यांना हवा भरत होते. इतके दिवस आमचे नुकसान केले, आता बघू तिकडे काय हवा भरून वाट लावतात ते.
> राज्यभरातील नेत्याचे लक्ष जळगाव महापालिकेकडे असणे सहाजिक आहे. अण्णा हजारेही अमेरिकेतून लक्ष ठेवून आहेत.

भाजपला सत्ता दिल्यास शहर दत्तक घेऊ : मुंडे
खान्देश विकास आघाडीला योजना राबविण्याचा शोक केवळ पैसे खाण्यासाठी होता. ही भ्रष्टाचाराची आघाडी आहे. हिंदुस्थानात सर्वात भ्रष्ट महापालिका म्हणून जळगावचे नाव आहे. 25 हजार लोकांसाठी साडेतीन लाख लोकांच्या डोक्यावर 10 हजाराचे कर्ज केले. पाच वर्षांची सत्ता दिल्यास हे शहर विकासासाठी दत्तक घेईल. या शहरावर एक पैसाही क र्ज राहू देणार नाही अशी घोषणा भाजपचे नेते व लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली. महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी खासदार मुंडे यांची बुधवारी सायंकाळी जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारसह खान्देश विकास आघाडीने केलेल्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला.
खासदार काय बोलले सभेत
> भ्रष्ट कारभारातून खाविआ नेत्यांच्या संपत्तीत वाढ झाली.
> या देशात न्यायालय, न्यायाधीश आहेत. गुन्हा केला म्हणूनच आमदार जैन जेलमध्ये आहेत.
> मुंबई, दिल्लीतही 2 हजार रुपये पाणीपट्टी नाही. जळगावात आहे एवढे कर हिंदुस्थानात कुठेच नाहीत.
> पाच वर्षे सत्ता द्या या शहरावर एक पैशाचेही कर्ज राहू देणार नाही.
> मोदींनी सुरत शहराला खुबसुरत केले पण दादाने जळगावला बदसुरत केले. हाच तुमचा गुन्हा आहे.
> विमानतळ बांधणारी जळगावची एकमेव पालिका आहे. हे शोक कशासाठी तर पैसे खाण्यासाठी.
> कोणता जैन कोणत्या पक्षात हे कळतच नाही. ईश्वरलाल जैन राष्टÑवादीत तर मनीष जैन काँग्रेससोबत आणि प्रचार कोणाचा करतात. कुंकू एकाचा आणि हनिमून...
> सुरेश जैन यांनी इतके पक्ष बदलले की फक्त भाजप राहिला आहे. मी व आमदार गिरीश महाजन यांनी म्हटले तरी खडसे त्यांना घेऊ देत नाही. कारण त्यांना पक्षनिष्ठा नाही.
> मुख्यमंत्र्यांच्या बायकोची पर्स चोरीला जाते. त्यातील सोने कुठे विकले? तर जळगावात. कोणाकडे?
> जळगावात काँग्रेस झिरो बजेट आहे. शिवसेना लढतच नाही. त्यांनी भाजपला रान मोकळे केले आहे.
> गृहमंत्री आर.आर.पाटील सभेचे काय बघता बलात्काºयाला पकडा व फाशी द्या. अन्यायाची परिसीमा झाली आहे.
> गुलाबराव देवकरदेखील गुन्ह्यात आरोपी आहेत. भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे सरकार आहे.
> जिथे इंदिरा गांधी पराभूत होऊ शकतात. तेथे सुरेश जैन किस झाड की पत्ती है.