जळगाव- शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी टवाळखोरांनी मध्यरात्री घराबाहेर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडल्या होत्या, ते सत्र आता पुन्हा सुरू झाले आहे. गुरुवारी रात्री १२.३० वाजता मुक्ताईनगर परिसरात मोटारसायकलीवर आलेल्या दोन टवाळखोरांनी चार कारच्या काचा लाकडी दांड्याने फोडल्या. हा प्रकार परिसरातील तरुणांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्यांचा खोटेनगरपर्यंत पाठलाग केला. मात्र, टवाळखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
गेल्या महिन्यात ओंकारेश्वरनगरात टवाळखोरांनी लाकडी दांड्याने कारच्या काचा फोडल्या होत्या. हे टवाळखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे सापडले होते. या घटनेनंतर गुरुवारी पुन्हा असाच प्रकार मुक्ताईनगरातील गट क्रमांक ३७ स्वामी समर्थ केंद्र परिसरात घडला. रात्री १२.३० वाजेच्या सुमारास दोन टवाळखोर मोटारसायकलीवर आले. त्यांनी सुरुवातीला मुक्ताईनगरातील प्लॉट क्रमांक ९मधील वैद्यकीय प्रतिनिधी प्रकाश भाऊलाल पाटील यांच्या झेन (एमएच ०५ एच ७९८४) या गाडीच्या समोरील काचावर दांडा मारून नुकसान केले आहे. पाटील हे नेहमी कार घराच्या आवारात पार्क करतात. परंतु, गुरुवारी घरी पाहुणे आल्याने त्यांनी गाडी काही वेळेसाठी घराबाहेर लावली होती. पाटील यांच्या कारचे नुकसान केल्यानंतर टवाळखोरांनी त्यांच्याच घराजवळ उभ्या असलेल्या ठाणे येथून आलेले संजय पाटील यांची झेन (एमएच ०४ डीडब्ल्यू ६८६०) या कारच्या काचा फोडल्या. त्यानंतर जुन्या वाहनांची विक्री करणारे दिलीप चौधरी यांची इंडिका (एमएच २८ सी ३३५७)ची काच त्यांनी फोडली.
स्वामी समर्थ मंदिराजवळ पोलिस कर्मचारी सुनील पाटील यांची इंडिका(एमएच १९ एपी ४६५०)ची काच फोडून पळ काढत असताना या टवाळखोरांना परिसरात उभ्या असलेल्या काही तरुणांनी पाहिले. त्यामुळे तीन-चार तरुणांनी त्यांचा मोटारसायकलीवर खोटेनगरपर्यंत पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत हे टवाळखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर शुक्रवारी वाहनधारकांनी जिल्हापेठ ठाण्यात अज्ञात टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी
द्रौपदीनगर, मुक्ताईनगरात गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून पाेलिसांनी परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रात्री मोकाट फिरणाऱ्या तरुणांचा बंदाेबस्त करावा, जेणे करून अशा घटना घडणार नाहीत, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.