आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात रेडिऑलॉजिस्ट बंद; रुग्णांना बसला फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- नांदेड येथील डॉक्टरच्या सर्मथनार्थ जिल्ह्यातील रेडिऑलॉजिस्टने केलेल्या बंद आंदोलनामुळे बाहेर गावाहून आलेल्या रुग्णांचे हाल झाले. खासगी रुग्णालयांचे दरवाजे बंद असल्याने रुग्णांनी साकेगावजवळील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली.

नांदेड येथील गर्भपाताच्या घटनेत डॉ. गोपाल बत्तलवार यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेली कारवाई चुकीचे असल्याचे मत व्यक्त करत राज्यभरात रेडिऑलॉजिस्ट संघटनेने बुधवारी एक दिवसीय बंद पुकारला होता. बंदचा निर्णय अचानक झाल्याने ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांचे हाल झाले. तपासणीसाठी आलेले रुग्ण हॉस्पिटल बंद असल्याने माघारी फिरत होते. बर्‍याच डॉक्टरांनी दवाखान्याच्या दरवाजाजवळ सूचना लावली होती. तर, अनेक डॉक्टरांनी बंदचा उपयोग पर्यटनस्थळी जाऊन केला. यादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन बंद असल्याने अनेकांना परतावे लागले. सोनोग्राफीसाठी आलेल्या एका रुग्णाची तपासणी डॉ. योगेश चौधरी यांनी केली. त्याचप्रमाणे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नेहमीपेक्षा दुपटीने रुग्णांची नोंदणी करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयात 14 जणांचे सीटी स्कॅन, एमआरआय 16, एक्स-रे 15 तर 12 जणांची सोनोग्राफी करण्यात आली.