आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेड येथील घटनेच्या निषेधार्थ जळगावात ‘रेडिओलॉजिस्ट’चा आज बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत डॉक्टरांवर झालेल्या कारवाईनंतर जळगाव जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी तीन दिवस हॉस्पिटल बंदचा निर्णय घेतला होता. यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले होते. आता पुन्हा नांदेड येथील गर्भपाताच्या घटनेत डॉक्टरांना अटक झालेल्या निषेधार्थ रेडिओलॉजिस्ट संघटनेने बुधवारी बंदचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून सिव्हील व डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीची सोय करण्यात आली आहे.

नांदेड येथे गर्भपात केल्याच्या आरोपात रेडिओलॉजिस्ट डॉ. गोपाल बत्तलवार यांना अटक केल्याच्या निषेधार्थ राज्य संघटनेने बुधवारी एक दिवसीय लाक्षणिक बंदचे आयोजन केले आहे. यात जळगाव जिल्ह्यातील सर्व रेडिओलॉजिस्ट सहभागी होणार आहेत. याबाबत खान्देश रेडिओलॉजी अँण्ड इमेजिंग असोसिएशनच्या जळगावातील सदस्यांनी मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.

सहकार्य करा
बंदमुळे सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी व एक्स रे सेंटर बंद राहणार असून रुग्ण, गरोदर महिलाची हेळसांड होणार असून त्यांनी सहकार्य करावे, असे पत्रक डॉ.एम.बी.पटवर्धन, डॉ.नंदन माहेश्वरी, डॉ. अनिल बोंडे, डॉ. अनुप परमार यांनी पाठविले आहे.

काय आहे प्रकार?
नांदेड येथे एका महिलेने कोणतेही प्रशिक्षण नसताना घरी 25 वर्षीय महिलेचा बेकायदेशीर गर्भपात केला. या प्रकरणी ज्या महिलेने गर्भपात केला तिला तसेच लिंगनिदान केल्याच्या माहितीवरून डॉ. बत्तलवार यांना अटक केली आहे.

आयएमए लांबच
सोनोग्राफी करणार्‍या डॉक्टरला गर्भपाताच्या कायद्याचे कलम लावणे चुकीचे आहे. जिल्हा आयएमए संघटना बंदमध्ये सहभागी नसली तरी बंदला पाठिंबा असल्याचे आयएमएचे सचिव डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले.

18 रेडिओलॉजिस्ट शहरात

सिव्हिल, गोदावरीत सोय
बंदकाळात रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात तसेच डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा उपलब्ध राहणार आहे. रुग्णांनी या ठिकाणी येऊन तपासणी करून घ्यावी, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एन.लाळीकर यांनी सांगितले.

कारवाई व्हावी
नांदेड येथील डॉ. बत्तलवार यांनी लिंगनिदान केल्यामुळेच मुलीचा गर्भ आहे हे स्पष्ट झाले त्यानंतरच गर्भपात करण्यात आला आहे. त्यात एकाचा जीव गेला असून महिलादेखील मृत्युच्या दाढेत होती.त्यामुळे डॉक्टरला झालेली अटक योग्यच असून कठोर कारवाई झाली पाहिजे. संघटनेनेदेखील योग्य-अयोग्यचा निकष लावला पाहिजे. वस्तुस्थिती जाणून घेण्याची गरज आहे.
-वासंती दिघे, सामाजिक कार्यकर्त्या.