आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दे धक्का ! पाच लाखांचा गुटखा पकडला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- राज्यातील गुटखा बंदी झुगारून भुसावळात सुरू असलेल्या काळ्या बाजाराला भुसावळ पोलिसांनी आठवड्यात दुसरा धक्का दिला. गुटखा तस्करीसंदर्भात ‘दिव्य मराठी’ने उघड केलेल्या धाग्यादोर्‍यांच्या आधारे शनिवारी राष्ट्रीय महामार्गालगत तब्बल पाच लाखांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत बाबू कारडा उर्फ बाबूशेठ, राकेश बठेजा याला अटक करण्यात आली.

गेल्या सहा महिन्यात रेल्वे सुरक्षा बलाने तीनवेळा एकूण पाच लाखांची गुटखा तस्करी उघडकीस आणली. यामुळे सावध झालेल्या तस्करांनी वाहनांचा आधार घेतला. लाखो रुपयांचा मलिदा मिळत असल्याने तस्करांनी थेट अकोला, औरंगाबाद, नाशिकपर्यंत हातपाय पसरले. भुसावळ शहरात राजरोसपणे गुटखी विक्री सुरू होती. गेल्या आठवड्यात बाजारपेठ पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुंदरनगरजवळ सव्वादोन लाख रुपयांचा गुटखा पकडला. मात्र, मुख्य सूत्रधार पोलिसांपासून अजूनही सुरक्षित आहे. दरम्यान, शहरातून चालणार्‍या गुटखा तस्करीबाबत ‘दिव्य मराठी’ने सातत्याने वृत्त प्रकाशित केले. राजकीय क्षेत्रात कार्यरत आणि ट्रॅव्हल्स एजन्सीच्या व्यवसायात गुंतलेली बडी हस्ती, सट्टाजुगाराच्या धंद्यात ‘बाबुगिरी’ने ओळखली जाणारी चांडाळचौकडी तस्करीचे मुख्य सूत्रधार असल्याची आतील गोटात चर्चा होती. शनिवारी दुपारी झालेल्या कारवाईने हे सत्य जगजाहीर झाले.

आरपीएफचा कारवाईचा धडाका
रेल्वे सुरक्षा बलाने 30 नोव्हेंबर 2012, 9 फेब्रुवारी 2013 (प्रत्येकी दोन लाख) आणि 3 मार्चला अडीच लाख असा पाच महिन्यात साडेसहा लाखांचा गुटखा रेल्वेतून तस्करी होताना पकडल्याचे निरीक्षक अजय यादव यांनी सांगितले.

तस्करी उखडून फेकू
गुटखा तस्करीची पाळेमुळे उखडून फेकू. ट्रॅव्हल्स, कुरिअर, संशयास्पद खासगी वाहनांच्या तपासणीचे आदेश कर्मचार्‍यांना दिले आहेत. अटकेतील आरोपींवर आयपीसी 328 नुसार कारवाई होईल. अजून कोणी गुंतले असल्यास, त्यांचाही शोध घेवू. एकाच आठवड्यात पोलिसांनी केलेली दुसरी कामगिरी कौतुकास्पद आहे. विवेक पानसरे, डीवायएसपी, भुसावळ

मथुरेतून भुसावळात
शनिवारच्या कारवाईत सापडलेला गुटखा मथुरेतून भुसावळात येत असल्याचे उघड झाले. तालुक्याच्या ग्रामीण भागासह परजिल्ह्यात या गुटख्याची तस्करी होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. विशेष म्हणजे आरपीएफने यापूर्वी तीनवेळा पकडलेला गुटका सुद्धा कानपूर (उत्तर प्रदेश)वरून आलेला होता. यामुळे भुसावळवर पोलिसांची खास नजर आहे.

45 रिकामी पोती
पोलिसांनी घटनास्थळी 145 रिकामी पोती सापडली. एका पोत्यामध्ये 18 हजार पुड्या मावतात. यामुळे एवढा गुटखा गेला कुठे? यादृष्टीने तपास सुरू झाला आहे. दोन महिन्यांपासून भाड्याने घेतलेल्या घरातील मुद्देमाल राकेश अमरलाल बठेजा आणि बाबू कारडा उर्फ बाबूशेठ यांच्या मालकीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. कारवाईनंतर दोघांना अटक करण्यात आली.

पाच लाखांचा गुटखा
कारवाईत पोलिसांना मथुरा येथे तयार झालेला ‘नजर’ नावाच्या गुटख्याच्या 1 लाख 53 हजार पुड्या सापडल्या. सात मोठे आणि तीन लहान, अशा 10 पोत्यांमध्ये हा गुटखा भरून ठेवला होता. या मुद्देमालाची किंमत सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त आहे. डीवायएसपी विवेक पानसरे, पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, उपनिरीक्षक नीता मांडवे, सतीष डोलारे, बाळू पाटील घटनास्थळी पाहणी,तर आरोग्य निरीक्षक अशोक फालक, दिलीप इंगळे यांनी पंचनामा केला.

अशी झाली कारवाई
बाजारपेठचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी गुप्त माहिती मिळाली. यानुसार त्यांनी आनंदसिंग पाटील, रवि पाटील, विजय जोशी, रमेश चौधरी, संदीप पालवे यांना राष्ट्रीय महामार्गालगतच्या वांजोळा रोडवर रवाना केले. बालाजी लॉनजवळील नारायण वाणी यांनी भाड्याने दिलेल्या घरावर पाळत ठेवली. दुपारी 4 ते 4.30 सुमारास घराची तपासणी केली असता गुटख्याचे घबाड मिळाले. बाजारपेठच्या पथकाने आठवड्यात दुसरी धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईला अजून व्यापक स्वरुप देणे गरजेचे आहे.