आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळमध्ये साकारणार ‘रेलनीर’, दोन हजार चौरस मीटर जागेवर असणार प्रकल्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - रेल्वेच्या 2010 च्या अर्थसंकल्पात नाशिकसाठी जाहीर केलेला दोन कोटी रुपये खर्चाचा ‘रेलनीर’ प्रकल्प आता भुसावळमध्ये साकारणार आहे. प्रकल्पासाठी रेल्वेच्या कंटेनर विभागाजवळ दोन हजार चौरस मीटर जागेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. प्रकल्प सुरू झाल्यावर दररोज एक लाख पाण्याच्या बाटल्या येथे भरल्या जातील.


रेल्वेस्थानकावर आणि धावत्या गाडीत प्रवाशांना स्वस्त, शुद्ध पाणी पिण्यास मिळावे म्हणून रेल्वे प्रशासनाने स्वत:चा मिनरल वॉटर व बॉटलिंग प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या 2010 च्या अर्थसंकल्पात नाशिकसह देशात सहा ठिकाणी हे प्रकल्प सुरू करण्याची घोषणा तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. त्यानुसार रेलनीर प्रकल्प नाशिकजवळील देवळाली रेल्वेस्थानकासमोरील मोकळ्या जागेत सुरू करण्याचे निश्चित झाले होते.


रेल्वे प्रशासनाने त्यासाठी निविदाही मागवल्या होत्या. मात्र, मुदत वाढवूनही प्रतिसाद न मिळाल्याने हा प्रकल्प रेल्वे प्रशासनाने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडे वर्ग करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आयआरसीटीसीने नाशिक ट्रॅक्शन मशीन वर्कशॉपजवळ जागेची पाहणी केली; परंतु तेथे पाणीटंचाई असल्याचे सर्वेक्षणात समोर आले होते. त्यामुळे आता हा प्रकल्प आयआरसीटीसीने भुसावळ येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीने तसा अहवाल
रेल्वे मंडळाकडे मार्च महिन्याच्या अखेरीस पाठवला आहे. मात्र, प्रकल्पाच्या प्रस्तावाला अद्यापही मंजुरीची प्रतीक्षा आहे.


प्रस्तावित प्रकल्प दृष्टिक्षेपात
*भुसावळमध्ये प्रस्तावित असलेल्या रेलनीर प्रकल्पासाठी दोन ते अडीच कोटींचे अंदाजपत्रक आहे. ते रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आले आहे.
*प्रकल्पासाठी कंटेनर विभागाजवळ दोन हजार चौरस मीटर जागा दिली जाणार आहे. तेथे नवीन पाइपलाइन, जागा सपाटीकरण होणार आहे.
*रेलनीर प्रकल्प साकारल्यानंतर तेथे दररोज एक लाख पाण्याच्या बाटल्या भरल्या जाणार आहेत. त्यासाठी दीड लाख लिटर पाणी लागणार आहे.
*देशभरात दळणवळणाची सुविधा आणि तापी नदी जवळच असल्याने उपलब्ध पाणी पाहता आयआरसीटीसीने या प्रकल्पासाठी भुसावळची निवड केली आहे.


प्रस्ताव बोर्डाकडे पाठवला
प्रस्तावित रेलनीर प्रकल्प आयआरसीटीसीचा आहे. त्याच्या मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला आहे. रेल्वे बोर्डाकडून या प्रकल्पाला कधी मंजुरी मिळते हे सांगता येणे शक्य नाही.
महेशकुमार गुप्ता, डीआरएम, भुसावळ