आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Bridge News In Marathi, Bridge Collapse Issue At Jalgaon, Divya Marathi

शॉर्टकट रस्त्यामुळे रेल्वे पूल धोक्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शिव कॉलनी येथील रेल्वे उड्डाण पूल शॉर्टकट मार्गांनी वेढला गेला आहे. पुलाचे संरक्षक कठडे तोडून नागरिकांनी वाहतुकीसाठी जवळचा रस्ता शोधला आहे. सुरुवातीला दुचाकीसाठी वापर होत असलेल्या रस्त्यावरून मोठी वाहनेदेखील जात असल्याने पुलाची साइडची भरती खाली घसरत असल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून अपघातांचेही प्रमाण वाढले आहे.

उड्डाण पुलावरील स्टील मटेरियलच्या मेन्टेनन्सची जबाबदारी रेल्वे विभागाची, तर त्यावरील डांबरी रस्ता आणि भरतीचा भाग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे. मात्र, महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आल्याने पुलाची जबाबदारी देखील प्राधिकरणाकडे आहे. तर एजन्सी चार्जेस देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीची कामे करवून घेतली जात असल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. यात जबाबदारी निश्चित नसल्याने पुलाच्या सुरक्षेकडे मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याची स्थिती आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले पत्र
पुलावरील स्टिलची काळजी रेल्वे विभागामार्फत घेतली जाते.पुलावरील खड्डे, सुरक्षा कठडे, शॉर्टकट रस्त्यामुळे अपघात आणि पुलांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तत्काळ दुरुस्ती करावी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. रामलाल चव्हाण, अभियंता, मध्य रेल्वे

अपघातांची शक्यता
पुलाच्या भरावावरून वाहने खाली जोरात येतात. वेळेत ब्रेक न लागल्यास दोन्ही बाजूने वाहने थेट रेल्वे रुळावर येण्याची भीती आहे. तर ब्रेक न लागल्यामुळे वाहन सरळ खाली घसरत जाऊन अपघात होत आहेत.

शॉर्टकटमुळे भराव ओसरला
पुलाला 100 मीटरपर्यंत टाकण्यात आलेल्या भरावाला पीचिंग करून सुरक्षा कठडे लावण्यात आले आहे. पुलाची हद्द संपल्यानंतर रस्ता वळवण्यात आला आहे. मात्र, हा लांबचा रस्ता टाळण्यासाठी सुरक्षाकडे तोडून शॉर्टकट मार्ग बनवण्यात आला आहे. सुरुवातीला दुचाकी वापरत असलेल्या रस्त्यावरून चारचाकी आणि अवजड वाहने देखील खाली उतवली जातात, त्यामुळे भराव खाली ओसरत असल्याची स्थिती आहे. पावसाळ्यात पाण्यासोबत माती ओघळत असून पुलावरील अवजड वाहनांच्या कंपनामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे.