आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Compartment Women Seating Problem Bhusawal

रेल्वेत महिलांसाठी स्वतंत्र डबे; सोय मात्र पुरूष प्रवाशांची!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - रेल्वेत महिलांसाठी असलेल्या स्वतंत्र डब्यात महिलांपेक्षा पुरुषांचीच संख्या जास्त राहत असल्याने महिलांची जागेसाठी गैरसोय होत आहे. रेल्वे सुरक्षाबलाच्या वारंवार कारवाईनंतरही पुरुष प्रवासी महिलांच्या डब्यातून प्र्रवास करतात. यामुळे महिला प्रवाशांचा रेल्वे प्रवास धोक्यात आला आहे.
सध्या रेल्वेमधील गर्दी वाढली आहे. अशा आरक्षण नसल्यास अनेक महिला लहान मुलांना सोबत घेऊन महिला राखीव डब्याचा आश्रय घेतात.मात्र,सध्या या डब्यातही पुरुषांची मक्तेदारी वाढली आहे. महिलांच्या डब्यात खिडकीजवळ सीट सांभाळून बसलेले अनेक पुरुष प्रवासी वेळप्रसंगी हुज्जत घालायला मागेपुढे पाहत नाहीत. यामुळे हक्काची जागा असूनही महिलांना मात्र गाडीत उभे रहावे लागते. काही महिला वाद नको म्हणून खाली बसणे पसंत करतात. रेल्वे सुरक्षा बलातर्फे महिलांच्या डब्यात बसणा-या पुरुष प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, फक्त सकाळच्या सत्रात येणा-या गाड्यांमध्येच कारवाई केली जाते. दिवसभरात येणा-या सर्वच प्रवाशी गाड्यांमध्ये तपासणी केल्यास नियम तोडणा-यांवर वचक बसणे शक्य आहे. केवळ भुसावळ स्थानकच नव्हेतर भुसावळ विभागातील ज्या-ज्या स्थानकावर गाडी थांबते, त्या-त्या ठिकाणी महिलांच्या डब्यात बसलेल्या पुरुषांवर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, रेल्वे सुरक्षा बलाचे या कामापेक्षा कोणत्या स्थानकावर किती अनाधिकृत वेंडर आहेत, त्यांच्याकडून काय आर्थिक फायदा होईल, याकडेच जास्त लक्ष असते. नियमित तपासणी किंवा गाडीत गस्त घालण्याच्या नावानेही बोंबाबोंबच आहे, असा सूर प्रवाशांमधून व्यक्त होतो. महिला डब्यातील पुरुषांच्या अतिक्रमणाला जीआरपी नियमित कारवाई करत नसल्याने पाठबळच मिळते.
रेल्वेची कारवाई सुरूच - महिलांच्या डब्यातून प्रवास करणा-या पुरुष प्रवाशांवर कारवाई सुरूच असते. यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान सकाळी येणा-या गोवा एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस व अन्य प्रवासी गाड्यांवर लक्ष ठेवून असतात. नियमबाह्य प्रवास करणा-या प्रवाशांना न्यायालयात हजर केले जाते. दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडून दिले जाते. 1 ते 12 जानेवारी या काळात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी 275 प्रवाशांवर कारवाई करीत त्यांच्याकडून 13 हजार 750 रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईला आता पुन्हा गती देण्यात येईल. महिलांप्रमाणेच अपंग प्रवाशांच्या डब्यात बसणा-यांना धडधाकट प्रवाशांना दंड भरावाच लागेल. - जुबेर पठाण, निरीक्षक, भुसावळ रेल्वे स्थानक