आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेरूळ ओलांडताना वर्षभरात 161 प्रवाशांचा ‘शॉर्टकट’ मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - रेल्वेरूळ ओलांडण्यासाठी शॉर्टकटचा वापर केल्याने गेल्या वर्षभरात तब्बल 161 प्रवाशांनी प्राण गमावला आहे. पादचारी पूल असतानाही केवळ आततायीपणामुळे हे प्रकार घडतात.

जळगाव स्थानकावर मंगळवारी सेवाग्राम एक्स्प्रेसमधून उतरलेल्या दोन प्रवाशांनीही नियमबाह्यपणे रेल्वेचे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त चंद्र मोहन मिर्श यांनी मोहीम राबवून कारवाईचे आदेश दिले आहेत. रेल्वेच्या अँक्ट 147 नुसार पादचारी पुलाचा वापर न करता रूळ ओलांडणे गुन्हा आहे. असे असले तरी दररोज शेकडो प्रवासी याकडे दुर्लक्ष करून रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. परिणामी अनेकांना प्राण गमवावे लागतात. तर काहींना आयुष्यभर जायबंदी व्हावे लागते. रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार थांबावे, यासाठी मंगळवारपासून रेल्वे सुरक्षा बलाने पुन्हा धडक मोहीम हाती घेतली आहे.

भुसावळ विभागाचे कार्यक्षेत्र ईगतपुरीपासून ते बडनेरा आणि भुसावळपासून खंडव्यापर्यंत आहे. या संपूर्ण कार्यक्षेत्रात रेल्वेच्या अँक्टनुसार अवैध खाद्य पदार्थांची विक्री, विना तिकीट प्रवास करणे, प्रवाशांकडून पैसे उकळणारे तृतीयपंथी, महिला बोगीतून प्रवास करणार्‍या पुरुषांवर कारवाई केली जाणार आहे. भुसावळ विभागात ज्या रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल नाही, अशा ठिकाणी रूळ ओलांडताना रेल्वेखाली चिरडून गेल्या वर्षभरात सहा जणांचा बळी गेला आहे. मात्र, यंदा जानेवारीपर्यंत ही संख्या तीनवर पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात 161 प्रवाशांचा मृत्यू रेल्वेरूळ ओलांडताना झाला. जानेवारीमध्ये हा आकडा 15 पर्यंत पोहोचला.

धडक मोहीम राबवू
भुसावळ विभागात गुरुवारपासून एक आठवडा रेल्वे सुरक्षा बलातर्फे धडक मोहीम राबवली जाणार आहे. त्यात नियमांचे उल्लंघन करून रूळ ओलांडणार्‍या प्रवाशांवर कारवाई करण्यात येईल. सूचना करण्यात आली आहे. चंद्र मोहन मिर्श, विभागीय आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल

अशी केली कारवाई
रेल्वे सुरक्षा बलातर्फे सन 2013 मध्ये वर्षभरात रेल्वे अँक्ट 147 प्रमाणे 4 हजार 761 प्रवाशांवर रेल्वे रूळ ओलांडण्याने कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयात त्यांच्याकडून 6 लाख 43 हजार 350 रुपये दंड वसूल झाला आहे. जानेवारी 2014 मध्ये 480 प्रवाशांवर नियमबाह्यपणे रेल्वेरूळ ओलांडल्याने कारवाई करण्यात आली. येत्या दोन दिवसांत प्रत्येक स्थानकावर ही मोहीम राबवली जाणार आहे.