आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेचा अभियंता गाजवतोय भुसावळचा रंगमंच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - मध्यरेल्वेच्या इंजिनिअरिंग विभागातील अभियंता मुकुंद महाजन यांनी बालपणापासून नाट्यसेवेचा वसा जोपासला आहे. गेल्या आठवड्यात उत्कर्ष कलाविष्कार निर्मित ‘रुस्तमबाबाची अंत्ययात्रा’ या नाटकात त्यांनी रंगवलेले कुल्फीवाल्याचे पात्र बोलके ठरले. रसिकांना खिळवून ठेवणारी भूमिका केलेले हे त्यांचे ७१वे नाटक होते. वाङ‌्मयनिर्मितीच्या प्रांतात ते ‘धनुर्धारी’ नावाने परिचित आहेत.

वडील गणेश महाजन हे संगीत नाटकात ऑर्गन वाजवायचे. काका गाेपाळराव महाजन हे बहुतांश नाटकांत स्त्री पात्र हुबेहूब वठवायचे. त्यांच्या तालमी पाहूनच नाटकाचे वेड लागले. वयाच्या आठव्या वर्षी शालेय पातळीवर सादर केलेल्या नाट्यछटेचे काैतुक झाले आणि या छंदाला आकार मिळाला, असे मुकुंद महाजन अभिमानाने सांगतात. रेल्वेत नोकरीला लागल्यापासून ते आजतागायत त्यांनी अनेक नाटकांत विनोदी, धीरगंभीर भूमिका साकारल्या आहेत. मात्र, अलीकडेच अनिल कोष्टी लिखित ‘रुस्तमबाबाची अंत्ययात्रा’ या नाटकात कुल्फीवाल्याची जी भूमिका साकारण्याची संधी मिळाली ती अविस्मरणीय राहील. थंडीच्या गारठ्याला विनोदाची ऊब देऊन नाट्यरसिकांना धबधबा कोसळतो तसे हसवण्यात जे यश मिळाले ते नवोन्मेष संचारणारे आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर दीर्घांक लिहायचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
*खून का रंग, बात पते की, दर्द सरदर्द, अदालत जारी है, धत‌् तेरी की, विश्वास, पती भंडार, आर्मी मॅरेज, सर्व धर्म महिला समिती,न्यू नेम, शहीद अशा ११ एकांकिकाही त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांचा हा एकांकिकांचा संग्रह ‘खून का रंग और अन्य लघु नाटक’ या नावाने प्रकाशित होणार आहे.

*भारतीय रेल्वेतर्फे सन २०००मध्ये त्यांना ‘मुन्शी प्रेमचंद कथा साहित्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. हिंदी भाषेतील तब्बल ४६ लघुकथा असलेला संग्रह ‘घुमती कहानियाँ’ या नावाने प्रकाशित झाला असून तो अतिशय चर्चेचा ठरला.
*अग्निवेश, कोण म्हणतो टक्का गेला?, आपलं बुवा असं आहे, या घर आपलंच आहे, आला अफ्सर, यासह तब्बल ७१ नाटकांत त्यांनी काम केले आहे. भोपाळ, इंदूर, खंडवा, रतलाम अकोला, मुंबई येथे होणा-या अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत.

काव्यलेखन सुरू
‘कलियुगभारी इथली रीत बघा न्यारी, नाेकरीच्या बाजारात फिरतात पोरं-पोरी’ अशा कविता ते लिहित आहेत.