आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway News In Marathi, Bhusawal Surat Railway Route, Divya Marathi, Jalgaon

दुरुस्तीच्या कामामुळे सुरत रेल्वेमार्गावरील वाहतूक होती तीन तास बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावर चावलखेडा ते गिरणा पुलादरम्यान रेल्वेरुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने गुरुवारी तब्बल सव्वातीन तास रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे अहमदाबादकडे जाणारी नवजीवन एक्स्प्रेस आणि भुसावळ-सुरत पॅसेंजर सकाळी 9.15 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत जळगावला थांबलेली होती. रेल्वे विभागाने अचानक केलेल्या या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
गुरुवारी सकाळी 9.15 वाजता नवजीवन एक्स्प्रेस जळगाव रेल्वेस्थानकावर आली. तेथून तिला जळगाव आऊटर (शिवाजीनगर)ला थांबवण्यात आले. त्यानंतर 9.30 वाजेपासून आलेली भुसावळ-सुरत पॅसेंजरलाही जळगाव रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक एकवर थांबविण्यात आले होते. दोन्ही रेल्वे बराच वेळ थांबून असल्यामुळे प्रवाशांनी ओरड केली असता, दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, थोड्या वेळात गाडी सुरू होईल, असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात येत होते; परंतु तरीदेखील तब्बल सव्वातीन तास दोन्ही गाड्या थांबून होत्या. त्यामुळे प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
अचानक बदल
गिरणा पूल ते चावलखेडादरम्यान रुळांच्या दुरुस्तीचे काम रविवारी केले जाणार होते. मात्र, ते गुरुवारी सकाळीच सुरू केले गेले; परंतु याबाबतच्या सूचना प्रवाशांसह रेल्वेस्थानक प्रशासनाला देण्यात आल्या नव्हत्या. गुरुवारी अचानक ते काम सुरू झाले. त्यामुळे यादरम्यान पॅसेंजर जळगाव स्थानकावरील एक नंबर प्लॅटफॉर्मवर थांबवण्यात आली. दरम्यान, दुपारी साडेबारा वाजता नवजीवन एक्स्प्रेस व भुसावळ-सुरत पॅसेंजर रवाना झाल्याचे स्टेशन प्रबंधक ए.एस.कुलकर्णी यांनी सांगितले.