आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Police Station,Latest News In Divya Marathi

रेल्वे पोलिस ठाण्यांची रचना ब्रिटिशकालीनच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- स्वातंत्र्य मिळून आज 67 वर्षे झालीत. तरीदेखील रेल्वे पोलिस ठाण्यांची रचना ब्रिटिशकालीनच आहे. ज्या रेल्वेस्थानकावर गुन्ह्यांची संख्या जास्त असेल, त्या ठिकाणी पोलिस ठाण्याची निर्मिती केली जाते. मात्र, जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असूनही येथे रेल्वे पोलिसांचे दूरक्षेत्रच कार्यरत आहे. त्यामुळे गुन्हा घडल्यावर त्याचा एफआयआर भुसावळला दाखल केला जातो. यासाठी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जळगावला रेल्वेच्या दूरक्षेत्राऐवजी पोलिस ठाणे सुरू करण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. परंतु तो अद्यापही शासनाच्या लालफितीत अडकल्यामुळे पोलिस ठाण्याचा प्रश्‍न रखडला आहे.
लोहमार्ग पोलिसांच्या अखत्यारित येणारे भाग आणि रेल्वेमध्ये वाढणारी गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता शहरात लोहमार्ग पोलिस ठाणे होणे गरजेचे आहे. सध्या जळगाव रेल्वे पोलिस दूरक्षेत्राला 1 एएसआय, 4 हवालदार आणि 5 पोलिस शिपाई असे एकूण 10 कर्मचारी कार्यरत आहे. माहिजी, म्हसावद, शिरसोली, जळगाव, पाळधी, भादली अशा 6 रेल्वे स्थानकांची जबाबदारी या 10 कर्मचार्‍यांवर आहे. त्यामुळे पाच कर्मचार्‍यांना 12 तास असे दोन सत्रात काम करावे लागते. अशातही एखाद्या कर्मचार्‍याची साप्ताहिक सुटी किंवा रजा असली तर बाकी चार कर्मचार्‍यांना कामकाज सांभाळावे लागते. एखादा मोठा गुन्हा घडल्यास त्याची नोंद करण्यासाठी फिर्यादीला भुसावळ गाठावे लागते.

जळगाव दूरक्षेत्रात पोलिसांची केवळ मुव्हमेंट डायरी असल्याने गुन्ह्याची तक्रार घेतल्यानंतर त्याची स्टेशन डायरीला नोंद करण्यासाठी पोलिस कर्मचार्‍यालाही भुसावळ येथेच जावे लागते. त्यामुळे फिर्यादी व पोलिस कर्मचार्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, लोहमार्ग पोलिस ठाण्यासाठी साधारणत: 1 निरीक्षक किंवा सहायक निरीक्षक, 2 उपनिरीक्षक आणि 50 कर्मचारी असा ताफा असतो. जळगावला पोलिस ठाणे झाले तर कर्मचारी संख्या 5 पटीने वाढेल. त्यामुळे गुन्हेगारीवर आळाही घालता येईल. तसेच फिर्यादीसाठी प्रवाशांना होणारा त्रासही वाचणार आहे.