आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्गाबाहेर योगेशकडे प्रश्नपत्रिका,उत्तरपत्रिका आली कशी ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - रेल्वे रिक्रुटमेंट सेल (आरआरसी)च्या ग्रुप डी परीक्षेचा पेपर फुटीप्रकरणातील संशयित योगेश भरसाकळे हा परीक्षा केंद्रात आला नाही. तरीही त्याच्याकडे प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पोहोचविण्यात त्याचे वडील तथा पर्यवेक्षक इंदर भरसाकळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर येत आहे. त्यामुळे योगेशजवळ प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका नेमकी कशी आली? याचा तपास पोलिस घेत आहेत. दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपल्याने योगेशला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला पुन्हा तीन दिवस (9 जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
भारतीय रेल्वेत खळबळ उडवून देणार्‍या आरआरसीच्या पेपर फुटीप्रकरणाला आता वेगळे वळण मिळत आहे. केवळ एकटा योगेशच नव्हे तर यामागे रेल्वेतील बड्या अधिकार्‍यांची साखळी कार्यरत असल्याचे तपासातून पुढे येत आहे. त्यादृष्टीने तपास सुरू होताच बड्या माशांनी शक्य तेथे वाटेत वेगवेगळे अडथळे आणणे सुरू केले आहे. रविवारी (ता. 3) शहरातील आदर्श हायस्कूलच्या इमारतीत आरआरसी परीक्षेचे केंद्र होते. या इमारतीच्या ब्लॉक सहामध्ये योगेश भरसाकळे याचा क्रमांक होता. विशेष त्याचे वडील या ब्लॉकचे पर्यवेक्षक होते.
या वेळी पेपर सुरू झाल्यावरही योगेश परीक्षा केंद्रात अथवा ब्लॉकमध्ये आला नाही. दरम्यान, पेपर परीक्षार्थींच्या हातामध्ये देण्यापूर्वी पर्यवेक्षक तथा योगेशचे वडील इंदर भगीरथ भरसाकळे पाणी पिण्याचा बहाणा करून ब्लॉकच्या बाहेर गेले होते. नेमके याचवेळी योगेशपर्यंत प्रo्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पोहोचल्याचे तपासातून पुढे येत आहे. बाजारपेठचे पोलिस उपनिरिक्षक साबळे यांनी अतिशय गुप्तपणे या प्रकरणाचा भंडाफोड केला. भुसावळ रेल्वेचे जंक्शन आहे. अनेक उच्चपदस्थ अधिकार्‍यांचा येथे राबता आहे. भरसाकळे याच अधिकार्‍यांमध्ये उठबस करणारे आहेत. त्यामुळे केवळ भरसाकळेच नव्हे तर अन्य काही बड्या अधिकार्‍यांचा यात सहभाग असल्याची शक्यता बळावली आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुरुवातीला फक्त उत्तरपत्रिका हरविल्याची नोंद करण्याची भूमिका काही रेल्वे अधिकार्‍यांनी घेतल्याने धागेदोरे वरपर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त झाला होता.
रेल्वेची फसवणूक - मुलगा परीक्षेला असतानाही इंदर भरसाकळे यांनी रेल्वे प्रशासनाला, माझे कोणीही परीक्षेला नाही, असे लिहून दिले. परीक्षा केंद्रातील मुलाचा क्रमांक असलेल्या वर्गावरच नियुक्ती मिळवली. केंद्र प्रमुखांसह इतर वरिष्ठांनी कितीही डोळे लावून दूध पिण्याचा प्रयत्न केला तरी उपनिरीक्षक साबळेंनी सर्वांचे पितळ उघडे पाडले आहे.
रेल्वेला अहवाल पाठवणार - इंदर भरसाकळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती रेल्वेला देवू. इंदर यांच्यावर रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना अटक शक्य आहे. संतोष साबळे, पोलिस उपनिरीक्षक, बाजारपेठ पोलिस ठाणे
प्रशासनाकडून चौकशी सुरू - रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतरच इंदर भरसाकळे यांच्यावर कारवाईसाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठवू. प्रदीप बारापात्रे, एडीआरएम, भुसावळ