आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनरल डब्यात प्रवाशांचा रेटा; आरक्षणही मिळेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - उन्हाळी सुटी आणि लग्नसराईमुळे रेल्वेगाड्यांमधील गर्दी प्रचंड वाढली आहे. परिणामी आरक्षित तिकीट मिळणे दूरच, जनरल डब्यात पाय ठेवायलासुद्धा जागा मिळत नाही. हे हाल टाळण्यासाठी आरक्षित तिकीट कन्फर्म झाले नाही तरी चालेल, या भूमिकेतून प्रवासी वेटिंगच्या तिकिटावरच आरक्षित डब्यात खाली बसून प्रवास करत आहेत.

मे महिन्याचा पहिला आठवडा संपत आला आहे. तरीही रेल्वेगाड्यांमधील गर्दी ओसरलेली नाही. जनरल डब्यातही जागा मिळत नसल्याने अनेक जण उभे राहून प्रवास करतात. उन्हाळी सुटीत पर्यटनासाठी बाहेर पडणार्‍यांनी अगोदरच आरक्षण करून ठेवल्याने बहुतांश गाड्यांना आता आरक्षित तिकीट मिळणे दुरापास्त झाले आहे. मात्र, आधीच उकाडा आणि जनरल डब्यातील गर्दीपासून सुटका करण्यासाठी काही प्रवासी आरक्षित डब्यातील वेटिंगचे तिकीट काढतात. जागा मिळाली तर ठीक, अन्यथा आरक्षित डब्यात खाली बसूनच प्रवास केला जातो. यामुळे सध्या प्रतीक्षा यादी ३००पर्यंत पोहोचली आहे. १० रेल्वेगाड्यांना तर नाे-रूम आहे. शिवाय मुंबईकडून येणार्‍या बहुतांश गाड्यादेखील हाऊस फुल्ल आहेत. दरम्यान, सोयीच्या प्रवासासाठी काहींनी डीआरएम कार्यालय गाठून व्हीआयपी कोट्यातून तिकीट कन्फर्म होईल, बर्थ मिळेल यासाठी अर्ज दिले आहेत. मात्र, सिट दोन आणि अर्ज १०० अशी स्थिती उत्पन्न होत असल्याने प्रशासनही कोंडीत सापडते.

अशी आहे प्रतीक्षा यादी
दादर-भुसावळएक्स्प्रेसला १५१, तर भुसावळ-दादर गाडीला ५१ वेटिंग आहे. दिल्लीला जाणारे प्रवासी भुसावळ-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस (व्हाया नागपूर) ला प्राधान्य देतात. ही गाडी मंगळवार, रविवारी भुसावळ येथून सुटते. या गाडीला दिल्लीकडे जाताना ६४ वेटिंग आहे. भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसला पुण्याकडे जाताना ३८, तर येताना १६५ वेटिंग अशी स्थिती आहे.

‘नाे-रूम’ आहे
कुर्ला-गाेरखपूरकुशीनगर एक्स्प्रेस, कुर्ला-गाेरखपूर सुपरफास्ट, काशी एक्स्प्रेस, मुंबई-राजेंद्रनगर, कुर्ला राजेंद्रनगर एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, हावडा मेल (व्हाया अलाहाबाद), गुजरातकडे जाणारी नवजीवन एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस या गाड्यांना नाे-रूम आहे. पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस या गाडीला १२१, तर नागपूरकडे जाणार्‍या सेवाग्राम एक्स्प्रेसला १८६ वेटिंग सुरू आहे.

हाॅलिडे स्पेशलची धूम
विभागातूनधावणार्‍या सर्व हाॅलिडे स्पेशल गाड्यासुद्धा हाऊस फुल्ल धावत आहेत. दर साेमवारी लखनऊ-कुर्ला ही गाडी सकाळी १०.३० वाजता भुसावळ स्थानकावरून सुटणार आहे. जबलपूर-पुणे ही गाडीसुद्धा साेमवारीच दुपारी ४.५० वाजता सुटेल. दर मंगळवारी नागपूर-पुणे ही गाडी आहे. कुर्ला-बनारस, छपरा-सुरत या गाड्यांची साेमवारी ११ मे राेजी शेवटची फेरी आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांची चांगलीच सोय झाली.
सुखकर प्रवास
उन्हाळी सुट्यांमुळे बहुतांश रेल्वे गाड्यांमधील गर्दी वाढली आहे. वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत, त्यांना सुखकर प्रवास करता यावा, यासाठी अजून काही हाॅलिडे स्पेशल गाड्या सुरू होणे शक्य आहे. प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा. विनातिकिट प्रवास करुच नये. नरपतसिंग,वरिष्ठ परिचालन प्रबंधक, भुसावळ मंडळ, मध्य रेल्वे