आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव रेल्वेस्थानकावर दीड किलोमीटरचा रूळ बदलणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक ३च्या डाऊन मार्गावरील सुमारे दीड किलोमीटरचे रेल्वेरूळ बदलण्याच्या कामास गुरुवारपासून सुरुवात झाली. शुक्रवारी दिवसभर १३ मीटरच्या रुळांना वेल्डिंगच्या साह्याने जोडण्यात आले. जोडून तयार झालेला हे मोठे रूळ पुढील काही दिवसांत मूळ जागेवर ठेवण्यात येणार आहेत.
सुमारे सहा ते सात वर्षांनंतर फलाटावरील रेल्वेरूळ बदलला जातो. या प्रक्रियेला टीआरआर (ट्रॅक रिप्लेसमेंट अॅण्ड रिपेअरिंग) असे म्हटले जाते. ते १० ग्राॅस मेट्रिक टन वजनाची क्षमता पूर्ण झाल्यानंतर रूळ कमकुवत होण्यास सुरुवात होते. त्यामुळे हे रूळ बदलण्याची प्रक्रिया राबवली जाते. तीच प्रक्रिया जळगावच्या क्रमांकाच्या प्लॅटफार्मवरील डाऊन लाइनवर सुरू आहे.

प्रवाशांनी उत्सुकतेने घेतला आनंद
मुळात रेल्वेरूळ समान रेषेत कसे ठेवले जातात, त्यातील अंतर उंची कशी समान असते, हा सामान्य माणसांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. शुक्रवारी रेल्वे कर्मचारी वेल्डिंगच्या साह्याने रूळ जोडत असताना उठणारे आगीचे लाेळ लाव्हा रसाप्रमाणे वाहणारे उष्ण मिश्रण लोकांनी उत्सुकतेने पाहिले.

काही दिवसांत रिप्लेसमेंट केली जाईल
^प्लॅटफार्म क्रमांक तीनवरील डाऊन लाइनचे रूळ बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात रूळजोडणी सुरू आहे. काही दिवसांत रिप्लेसमेंट करण्यात येईल. कैसरअली, वरिष्ठअनुभाग अभियंता, रेलपथ
अत्याधुनिक पद्धतीने वेल्डिंग
रेल्वेरूळ १३ मीटरच्या तुकड्यांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांना जोडण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीने वेल्डिंग केली जात आहे. दोन रुळांमधील सुमारे दोन ते तीन सेंटिमीटरची फट भरून काढण्यासाठी त्यात ३०० अंश सेल्सियस तापमानात साडेचार मिनिटे रूळ गरम करण्यात येतात. त्यानंतर वेल्डिंग मशीनच्या साह्याने या फटीमध्ये त्याच तापमानात गरम केलेले लोखंड, कार्बन स्टीलची भुकटी टाकली जाते. हे मिश्रण टाकताच आगीचा मोठा भडका होतो, तर शिल्लक राहिलेले मिश्रण लाव्हा रसाप्रमाणे रुळाच्या आजूबाजूला वाहत जाते. अशा या कठीण उष्ण वातावरणात हे रूळ जोडण्याचे काम कर्मचारी करत आहेत. येणाऱ्या दोन-तीन दिवसांत जोडून तयार झालेले मोठे रूळ जुन्या रुळाच्या जागेवर ठेवले जाणार आहेत.