आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे पादचारी पुलाचे काम लांबणार; केबलचा अडथळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - रेल्वेच्या पादचारी पुलाचे काम गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. कॉलम टाकण्यासाठी खड्डे खोदले जात आहेत. मात्र, या ठिकाणी सिग्नल अ‍ॅँड टेलीकॉमच्या केबलचा अडथळा येत असल्याने काम रखडले आहे.
शहरातील जंक्शन रेल्वेस्थानकावर नवीन पादचारी पुलाच्या कामासाठी रेल्वे मंत्रालयाकडून 5 कोटी 87 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. प्रत्यक्ष कामासाठी 40 लाखांचा टोकन निधी प्राप्त झाला आहे. संकल्प चित्रालाही मान्यता मिळाली आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता पूर्ण करून पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून पुलाचा पाया खोदण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी हे काम केले जात आहे, त्याच ठिकाणी पाच ते सात फूट खोल अंतरावर सिग्नल अ‍ॅँड टेलीकॉम विभागाची केबल आहे. ती काढणे अशक्य असल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. पादचारी पुलासाठी आवश्यक असलेले संकल्पचित्र मंजूर झाले असून मध्य रेल्वेच्या मुंबई येथील मुख्यालयाकडून ते भुसावळ विभागाला प्राप्त झाले आहे. पुलाच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले असता अवघ्या सात फुटावरच पाणी लागले. पाणी व सिग्नलच्या केबलमुळे या कामाला अडथळा येत आहे. पावसाळा सुरू झाला तर हे काम किमान तीन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
रॅम्पसारखी रचना, पायर्‍या विरहित पूल
- पुलाच्या कामासाठी अडथळा ठरणारी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेची केबल हटवणे मोठे आव्हान आहे. याबाबत रेल्वे प्रशासन तज्ज्ञांचे मार्गदर्र्शन घेत आहे. त्यामुळे सध्या काम रखडल्याचे प्रथमदर्शनी चित्र आहे.

- पुलाची सुरुवात रेल्वेस्थानकाच्या शेजारील पार्किंगपासून करण्यात आली आहे. सायकल पार्किंगपर्यंत हा पूल उभारला जाणार आहे. रेल्वे लाइनपासून त्याची उंची 20 फूट राहील. लांबी 160 मीटर तर रुंदी 16 फूट राहील.
- पुलाची रचना रॅम्पसारखी असणार आहे. अपंग प्रवासी, कुली यांना होणारा त्रास या नव्या रचनेमुळे वाचणार आहे. पायर्‍या विरहित हा पूल असेल. काम दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

- भुसावळ रेल्वेस्थानकावर आठ फलाट आहेत. नवीन पादचारी पूल या सर्व फलाटांना जोडला जाणार आहे. पूर्वीच्या पुलावर होणारी प्रवाशांची गर्दी कमी होईल. खंडवानंतर भुसावळ स्थानकावर हा पायर्‍या विरहित पूल असेल.