आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकर्‍यांचे नुकसान: संततधार पावसाचा कांदा रोपाला फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- भुसावळ तालुक्यात संततधार पावसामुळे कांदा रोपाला फटका बसला आहे. तालुक्यातील तळवेल, वेल्हाळे, फुलगाव, साकेगाव आदी परिसरातील कांद्याचे रोपे वाहून गेल्याने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यावलप्रमाणेच भुसावळ तालुक्यातील कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी पुढे आली आहे.

भुसावळ तालुक्यातील तळवेल, फुलगाव, वरणगाव, अंजनसोंडे, फेकरी, साकरी, आचेगाव, वेल्हाळे आदी भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. खरीप हंगामात मूग किंवा उडिदाची पेरणी करुन पोळ्यादरम्यान कांद्याची लागवड होते. यासाठी शेतकरी पावसाळ्यातच कांद्याची रोपवाटिका तयार करतात. यासाठी शेतकर्‍यांनी गेल्या महिन्यात 700 ते 800 रुपये प्रतिकिलो किमतीचे बियाणे आणून रोपवाटिका तयार केली होती. मात्र, गेल्या पंधरवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे कांद्याचे बियाणे वाहून गेले आहे. काही ठिकाणी तुरळक उगवण झाली. मात्र, अतिपाण्यामुळे या रोपांची मुळे कुजली आहेत. प्राथमिक माहितीनुसार भुसावळ तालुक्यात सुमारे दोन क्विंटल कांद्याचे बियाणे पावसामुळे वाया गेले आहे.

एवढे मोठे नुकसान होऊनही कृषी विभागाने दखल घेतलेली नाही. या मुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दुसरीकडे यावल तालुक्यातील शेतकर्‍यांना मात्र कृषी विभागाने पंचनामे करुन दिलासा दिलेला आहे. दरम्यान, आता झालेल्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांना कांदा लागवडीसाठी पुन्हा रोपवाटिका तयार करावी लागेल.