आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावर तासन‌्तास थांबून जमवले ४०० सुविचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विविध छंद जोपासणाऱ्या व्यक्तींची संख्या समाजात कमी नाही. मात्र, हे छंद माहितीबरोबर आनंद देणारे असणेही आवश्यक आहे. तिकिटे, नाणी, विविध अंकांच्या नोटा, पोस्टकार्ड आदी शेकडो प्रकारचे छंद जोपासले जातात. तसेच अनेक व्यक्ती आपल्या नावापेक्षा जोपासलेल्या छंदातून ओळखल्या जातात. शहरातील कानळदा रस्त्यावर असलेल्या लक्ष्मीनगरातील राजेश उमाशंकर दांडगे (परदेशी) हे व्यक्तिमत्त्वही याच प्रकारातले. त्यांना रिक्षा, ट्रकसह अवजड वाहनांच्या पुढे मागे िलहिलेले विविध स्लोगन (घोषवाक्ये) जमवण्याचा छंद आहे. त्यासाठी महामार्गावर प्रत्यक्ष तासन््तास थांबून चारशेपेक्षा अधिक स्लोगन, म्हणी, सुविचार जमवण्याचा छंद त्यांनी सुरूच ठेवला आहे. सहज मिळणाऱ्या स्लोगन म्हणींपेक्षा आगळ्यावेेगळ्या प्रकारातील, विविध भाषांतील स्लोगन मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. त्यासाठी इंटरनेट, कुठलेही संकेतस्थळ अथवा पुस्तकाचा आधार घेता हा छंद प्रत्यक्ष माहिती घेऊन जोपासण्याचे ठरवले.

विविध भाषांतील स्लाेगनचे भाषांतर
देशभरातून येणाऱ्या विविध वाहनांवर विविध भाषांमध्ये स्लोगन दिसून येतात. बऱ्याचदा अन्य भाषेतील स्लोगनचा फोटो काढून त्याचे जाणकारांकडून भाषांतर करावे लागते. ट्रक टेम्पो या वाहनांवर ‘बघतो काय रागानं... ओव्हरटेक केलेय वाघानं’, ‘रानी बना के रख, राजा बना दुंगी... शराब पिकर चलाया तो कब्रस्तान पहुंचा दुंगी...’ ‘जलो मगर तरक्की करके’, ‘लटक मत, टपक जायेगा’, ‘विचार बदला, नशीब बदलेल’, ‘माझ्याशी पैज लावू नका, लय महागात पडेल. कारण चालक शिकत आहे’ या प्रकारातील माहिती देणारे स्लोगनही दांडगे यांनी जमवले आहेत. पुढील तीन महिन्यांत नेहमीपेक्षा वेगळे असणारे एक हजारावर स्लोगन सुविचार जमवण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. आपल्या छंदाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

महामार्गावर दररोज तास
राजेश दांडगे यांनी दैनंदिन कामांतून काही वेळ काढून हा छंद पूर्ण करण्याचा संकल्प केला. रिंग रोडवरील डॉ.काबरा यांच्याकडे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असताना त्यांनी दररोज जेवणासाठी मिळणारा वेळ छंदासाठी देण्याचे ठरवले. त्यानुसार दररोज महामार्गावरील प्रभात कॉलनी, अजिंठा चौफुलीसह रेमंड चौफुली या भागात थांबून विविध लहान अवजड वाहनांवर लिहिलेले स्लोगन टिपण्याचे काम सुरू केले. सिग्नलवर वाहनांचा वेग कमी होताे. त्यामुळे सिग्नलच्या बाजूला कागद पेन घेऊन वाहने थांबलेल्या वेळेत स्लोगन लिहून घेण्याची कसरतही त्यांना अनेकदा करावी लागली. याशिवाय अनेकदा वाहनाच्या मागे धावून स्लोगन, सुविचार वा संदेश वाचून घेण्यासाठी धडपड करावी लागली. अनेकदा एकाच वेळी शंभरापेक्षा अधिक वाहने ये-जा करत असल्याने लहान अक्षरांतील वाचणे कठीण होते, असे दांडगे यांनी सांगितले.