आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajwade Research Institute Always Face Parking Problem

राजवाडे संशोधन मंडळाला नेहमी अवैध पार्किंगचा विळखा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - राजवाडे संशोधन मंडळ हे शहराचे भूषण आहे. देशभरातून अभ्यासक येथे संशोधनासाठी येतात. हजारो दुर्मीळ ग्रंथ साहित्य, मूर्ती, साधने यांचा संग्रह या मंडळात आहे. मंडळाची ही वास्तू लक्षवेधी आहे. मात्र, या देखण्या वास्तूभोवती नेहमी वाहनांचा गराडा पडलेला असतो. ही वाहने जणू या मंडळाचीच मालमत्ता आहे किंवा संशोधनाचा एक भाग आहे, अशा अवस्थेत बाहेर लावलेली असतात. सर्रासपणे अतिक्रमण करून उभ्या असलेल्या वाहनांमुळे संशोधन मंडळाची वास्तूही लक्षात राहत नाही, अशी स्थिती आहे.
शहरातील राजवाडे संशोधन मंडळ हे वैभव आहे. या संशोधन मंडळात शेकडो वर्षांचा इतिहास साठवलेला आहे. अनेक दुर्मीळ ग्रंथांचा येथे खजिनाच आहे. अनेक इतिहासाच्या अभ्यासकांना हे श्रद्धास्थानापेक्षा कमी नाही. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे हे पुण्यातील त्यांचे सर्व संग्रह, ग्रंथांचे बाड घेऊन धुळे शहरात आले आणि येथेच त्यांनी त्यांचे संशोधन कार्य पुढे सुरू ठेवले. अनेक भागात भटंकती करून त्यांनी हे सर्व वैभव जमा केले आहे. आज त्याची ख्याती राज्यात नव्हे तर देशपातळीवरून परदेशातही गेली आहे. देश-विदेशातील इतिहासाचे अभ्यासक येथील दुर्मीळ ग्रंथ आणि बाडाच्या अभ्यासासाठी येथे येतात. त्यामुळे शहरातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ते आहे. महापालिकेच्या मागील बाजूस रस्त्याच्या बाजूला ही वास्तू आहे. आत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. मात्र, या मंडळाबाहेर काही दिवसांपासून येथील जागेवर फेरीवाले, रस्त्याच्या बाजूला बसणारे विक्रेते आणि चक्क मोठी अवजड वाहनांनी अतिक्रमण केले आहे. शहरात पार्किंगचा प्रश्न आधीच ऐरणीवर असताना अशी मोठी वाहने रस्ताच्या कडेला दिवसेंदिवस अशी सर्रासपणे उभी असतात. त्याकडे कोणत्याही वाहतूक विभागाच्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे लक्ष जात नाही की कारवाई होत नाही. ही वाहने अतिज्वलनशील पदार्थ वाहतूक करणारी असल्याने ती अधिक वेळ उभी राहणेही धोकादायक आहे. शिवाय मंडळात येणार्‍या नागरिकांना वाहने लावण्यासाठी जागाच नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे निदान अशा महत्त्वाच्या वास्तूचा तरी विचार करून हे अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. संबंधित चौकात रस्ता लहान आहे. त्यातच वाहनांची गर्दी होते.
राजवाडे संशोधन मंडळाची वास्तू जशी संग्रहालय म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मंडळाची वास्तूही देखणी आहे. शहरात ती लांब अंतरावरूनही लक्ष वेधून घेत असताना त्यासमोर उभा असलेल्या अतिक्रमित वाहनांमुळे त्याच्या मूळ सौंदर्याला बाधा पोहोचत असल्याने अगोदर समज देऊन त्यानंतर जिल्हा पोलिस प्रशासनाकडेच तक्रार करण्यात येणार आहे. संजय मुंदडा, कार्याध्यक्ष, राजवाडे संशोधन मंडळ