आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायेचा धागा वीस टक्क्यांनी महागला; दीड हजार प्रकार उपलब्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात विक्रेत्यांनी राख्यांची दुकाने थाटली आहेत. महागाईचा फटका राख्यांनाही बसला आहे. गतवर्षाच्या तुलनेत राख्यांच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली असून, राख्यांचे सुमारे दीड हजारावर प्रकार उपलब्ध आहेत.

बाजारपेठेत पारंपरिक राख्यांबरोबरच विविध प्रकारच्या डायमंडचा वापर करून तयार केलेल्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. शहरातील फुलवाला चौक, आग्रारोड, जयहिंद कॉलनी चौक, दत्त मंदिर परिसर, लेनिन चौकासह विविध भागात विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत; परंतु यंदा रक्षाबंधनावर महागाईचे सावट आहे. गतवर्षापेक्षा यंदा व्यापाºयांनी मर्यादित प्रकारातच राख्या विक्रीसाठी आणल्या आहेत. राख्या खरेदी करण्यासाठी आता महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याची स्थिती आहे. टपाल कार्यालयातही राख्या पाठविण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

सहा रुपयांपासून पुढे राख्या विक्रीस उपलब्ध
राख्यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या वर्षापर्यंत तीन ते चार रुपयांपासून राखीच्या किमती सुरू होत होत्या; परंतु यंदा सहा रुपयांच्या खाली बाजारात राखी नाही. राख्यांची 72 रुपये डझनपासून विक्री केली जात आहे. पुढे 30, 40, 50 रुपये नगाप्रमाणे राख्यांची विक्री होत आहे. तर चांदीची पॉलिश केलेल्या राख्यांची विक्री 100 रुपयांपासून पुढे होत आहे. त्यामुळे राख्या घेताना ग्राहकांना विचार करावा लागत आहे.

रक्षाबंधनाचे लहान मुलांमध्ये मोठे आकर्षण असते. या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी कार्टून आणि आकर्षक प्रकारच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यात पॉकेमॅन, छोटा भीमसह विविध प्रकारच्या कार्टूनचे स्टीकर असलेल्या राख्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर प्लास्टिकच्या मण्यांपासून तयार करण्यात आलेल्या राख्यांही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

सीमेवरील जवानांना पाठविल्या राख्या
भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण दोन दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सीमेवरील जवानांसाठी राख्या पाठविण्यात आल्या. त्यासाठी परिषदेतर्फे प्रत्येक महाविद्यालयातून जवानांसाठी राख्यांचे संकलन करण्यात आले. या उपक्रमात भावना वंगवर, शीतल पाटील, धनश्री चांदोडे, कांचन शेलार, रोहिणी सोनवणे, सोनल अग्रवाल, पल्लवी कोतकर, ज्योत्स्ना पाटील आदी सहभागी झाले.