आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raksha And Eknath Khadse News In Marathi, Lok Sabha Election, Jalgaon

नाराजी दूर करण्यासाठी सासरा-सून सरसावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाने पहिल्याच यादीत जाहीर केलेली विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी परवा अचानक रद्द करून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा यांना उमेदवारी दिली. विशेष परिस्थितीत निर्णय घेतल्याचे प्रदेश कमिटीने म्हटले आहे. उमेदवारी तर मिळाली पण या सर्व घडामोडीत कुठे नाराजी तर कुठे समाधान असे वातावरण निर्माण झाले. नाराजीचे वातावरण निवारण्यासाठी स्वत: एकनाथ खडसे यांनी रक्षा यांच्यासह यांनी भालोद येथे जावून हरिभाऊंसह सर्वच नाराजांची समजूत काढली.


रक्षा भरणार 4 एप्रिलला अर्ज
भाजप उमेदवार रक्षा खडसे येत्या 4 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोमवारी रात्री मुक्ताईनगरमध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. खासदार हरिभाऊ जावळे आणि प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन मात्र बैठकीला अनुपस्थित होते. रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुक्ताईनगर येथील खडसे यांच्या फार्महाऊसवर प्रमुख पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, सरचिटणीस यांची तातडीची बैठक रात्री 7 वाजता झाली. जिल्हा सरचिटणीस डॉ.विजय धांडे यांनी मागील निवडणुकीतील मतदानाचा आढावा आणि तालुक्यातील सद्यस्थितीची माहिती घेतली. उमेदवार रक्षा खडसे 4 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जिल्हा संघटक अ‍ॅड.किशोर काळकर यांनी सांगितले. या वेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, मंदाताई खडसे, उमेदवार रक्षा खडसे, आमदार चैनसुख संचेती, मोहंमद हुसेन, उदय वाघ, डॉ.राजेंद्र फडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. खासदार जावळे आणि आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन मात्र गैरहजर होते.


भालोद गाठून घेतले आशीर्वाद
रक्षा खडसे यांनी मंगळवारी प्रथमच खासदार हरिभाऊ जावळे यांची भालोद (ता. यावल) येथील निवासस्थानी भेट घेतली. पक्षाने संधी दिली. चांगले काम करू, असे त्यांनी 10 मिनिटांच्या धावत्या भेटीत सांगितले. रक्षा खडसेंना संधी देण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन यांना सोमवारी सायंकाळी भालोद गाठावे लागले. खुद्द खासदार जावळेंनी नि:स्वार्थी भूमिकेतून पक्षासाठी काम करा, अशी संयमी भूमिका घेतली. यानंतर मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास स्वत: रक्षा खडसे यांनी काही महिला कार्यकर्त्यांसह भालोदमधील जावळेंचे निवासस्थान गाठले. पक्षाने प्रतिनिधित्वाची संधी दिली. महिलांच्या समस्या आणि महागाईचा मुद्दा आक्रमकपणे मांडू. यासाठी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्यासाठी भालोदला आल्याचे त्यांनी सांगितले. तर खासदार जावळे यांनी पक्षाने माझे तिकीट कापलेले नाही. उमेदवारीत बदल केल्याचे सांगून एकदिलाने विजय मिळवण्यासाठी काम करू, असे सांगितले.


खडसे जावळेविरोधकांना भेटले
माजी जिल्हा परिषद सदस्य भरत महाजन आणि यावलमधील नगरसेवक अतुल पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे खुद्द विरोधी पक्षनेत्यांनी सोमवारी सायंकाळी नगरसेवक अतुल पाटील यांच्यासह जावळेंविरोधी गटाच्या कार्यकर्त्यांची यावलमध्ये भेट घेतली. विशेष म्हणजे यापैकी काहींनी गेल्या पंधरवड्यात पक्षविरोधी भूमिका घेत उघडपणे मनीष जैन यांचे काम करू, असे आव्हान दिले होते. खासदार जावळे यांना पक्षातून विरोध आहे, असे चित्र रंगवण्यासाठी यावलमध्ये खलबते झाली. यामध्ये आघाडीवर असलेल्यांवर कारवाई व्हावी. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत महाजन यांनी, पक्षाला दोन हजार कार्यकर्ते हवे की दोन, याबाबत खडसेंना माहिती देऊन योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे. तत्पूर्वी, खासदार हरिभाऊ जावळेंविरोधी मोहिमेत पुढे असलेल्यांपैकी काही मोजक्याच कार्यकर्त्यांची खुद्द विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सोमवारी यावलमध्ये भेट घेतली. त्यातून बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे.


मतदान वाढवण्यासाठी उपक्रम
मतदार जागृती उपक्रमांचा आढावा निरीक्षक व्ही. पलानीचामी यांनी मंगळवारी घेतला. मतदार जागृतीसाठी स्थापन केलेल्या ‘स्वीप’विषयी माहिती दिली. मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ व्हावी, तसेच नव्याने यादीत नावे समाविष्ट झालेल्या मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करावे, अशी सूचना निरीक्षक पलानीचामी यांनी केली. मंगळवारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकप्रसंगी सहायक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे, भुसावळचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार भांगरे, तहसीलदार गजेंद्र पाटोळे, ए. टी. खैरनार, सुभाष सोनवणे, एस. सी. काळे यांच्यासह लोकसभा क्षेत्रातील बीएलओ उपस्थित होते. बीएलओंचे मानधन तीन हजारांवरून पाच हजार रुपये झाले आहे.एकापेक्षा जास्त मतदान केंद्रांवरील अधिका-यांना 750 रुपये मानधन मिळणार आहे. तसेच लोकसभा क्षेत्रातील बीएलओंना एडीसीच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता येईल, तर क्षेत्राबाहेरील बीएलओंना पोस्टलद्वारे मतदानाचा अधिकार असेल असे गजरे यांनी सांगितले.