जळगाव- श्रावणात नागपंचमी झाल्यानंतर सणवारांची चाहूल लागते. पहिल्या रविवारी कानबाईचा सण झाल्यानंतर आता दुस-या रविवारी येणा-या राखीपौर्णिमेची तयारी सुरू झाली आहे. बाजारही वेगवेगळ्या आकर्षक राख्यांनी सजायला सुरवात झाली आहे. यादिवशी भद्रा येत असल्याने भद्रा संपल्यानंतर रक्षाबंधन साजरे करण्यात येईल. राखी बांधण्यासाठी उत्तम वेळ दुपारी 1.37 पासून ते रात्री 10.39पर्यंत राहील. त्यामुळे रक्षाबंधनासाठी फक्त नऊ तास दोन मिनिटे एवढाच मंगल मुहूर्त असेल. 10 ऑगस्टच्या सकाळी 6.05 वाजता सूर्यादयापासून रात्री 11.38 वाजेपर्यंत पौर्णिमा तर सूर्योदयापासून रात्री 10.39 वाजेपर्यंत श्रवण नक्षत्रही असेल, या वेळात राखी बांधता येऊ शकते. मात्र, 9 ऑगस्टच्या पहाटे 3.35 वाजेपासून ते 10 ऑगस्टला दुपारी 1.37 वाजेपर्यंत भद्रा काळ आहे. शास्त्रानुसार भद्रा काळात विवाह कार्यापासून कोणतेही शुभ कार्य वर्ज्य असते. त्यामुळे या काळात रक्षाबंधन करता येणार नाही. 10 ऑगस्टला दुपारनंतरच रक्षाबंधनाचा उत्तम काळ असेल.
भद्रा शुभ कार्याला ठरतोय वर्ज्य
ज्योतिष कुळात 11 करण असतात, यातील चार स्थिर तर सात चर असतात. यामध्ये भद्रा हे एक करण असते, जे शुभ मानले जात नाही. प्रत्येक मासाच्या एका पक्षात चार वेळेस भद्रा करण येतात. भद्राला दारिद्र्य मानले जाते. त्यामुळे या काळात विवाह, रक्षाबंधनासह कोणतेच शुभ कार्य केले जात नाही.