आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raksha Khadse News In Marathi, BJP, Sharma, AAP, Divya Marathi

‘आप’कडून शर्मांना, तर भाजपाकडून रक्षा खडसेंना संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने अखेर रावेरमधून रक्षा खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ‘विशेष परिस्थितीनुसार’ उमेदवारी बदलण्यात येत असल्याचे पत्र पक्षाच्या प्रदेश सरचिटणिसांनी खासदार हरिभाऊ जावळे यांना पाठवले आहे. दरम्यान, केंद्रीय समितीकडूनच आपली उमेदवारी बदलल्याची घोषणा व्हावी, अशी जावळेंची इच्छाही अपूर्ण राहिली.


पक्षाच्या पहिल्याच यादीत हरिभाऊ जावळे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उमेदवारी बदलली जाईल, अशी चर्चा सुरू होती. शनिवारी एकनाथ खडसे यांनी उमेदवारी रक्षा खडसे यांना जाहीर होणार असल्याचे सांगितलेही होते. त्या संदर्भात पक्षाचे पदाधिकारी जावळे यांना भेटायला गेले असताना आपली उमेदवारी बदलल्याची घोषणा केंद्रीय समितीकडून व्हावी, अशी अपेक्षा जावळे यांनी केली होती, असे सांगण्यात आले. मात्र, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र भुसारी यांचे पत्र फॅक्सद्वारे सायंकाळी जावळे यांना मिळाले. त्यात विशेष परिस्थितीनुसार आपल्या उमेदवारीऐवजी केंद्रीय निवडणूक समितीच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी रक्षा खडसे यांची उमेदवारी निश्चित केली आहे, असे नमूद करण्यात आले आहे. ‘विशेष परिस्थिती’ कोणती होती, असे आपण भुसारी यांना फोनवरून लगेचच विचारले; मात्र, त्यांनी प्रत्यक्ष भेटीत बोलू एवढेच सांगितले, असे जावळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले.


पद असेल तरच सेवा होते असे नाही : पार्लमेंट्री बोर्डाने निर्णय घेतल्यानंतर विद्यमान खासदारांचे तिकीट बदलेल असे वाटत नव्हते. आठवडाभरापूर्वी नाथाभाऊ उमेदवार म्हणून माझेच नाव घेत होते. मग पाच, सहा दिवसांत अशी कोणती परिस्थिती बदलली, असा प्रश्‍न आहे. कार्यकर्ते थोडे नाराज झाले. परंतु पद असेल तरच सेवा होते असेही नाही. भविष्यात संधी मिळण्यासाठी कोणताही शब्द टाकलेला नाही. पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसेंसाठी चांगले काम करून दाखवेल. हरिभाऊ जावळे, खासदार.


भुसावळातील शर्मांना मिळाली संधी
‘नवशक्ती’चे राजीव शर्मा : राजीव सत्येंद्र शर्मा (वय 47) हे भुसावळच्या नवशक्ती आयुर्वेदालयाचे संचालक आहेत. त्यांच्याकडे सध्या गोंदिया ते नाशिक कार्यक्षेत्र असलेल्या रोटरी क्लब 3030 डिस्ट्रिक्टची प्रांत सचिव म्हणून जबाबदारी आहे. त्यांनी 98 वेळा रक्तदान केले असून आजपर्यंत कोणतीच निवडणूक लढवलेली नाही. परंतु सामाजिक उपक्रमात ते कायम अग्रेसर राहिले आहेत.


मंत्रिपदाची होती संधी
दोन वेळा आमदार व दोन वेळा खासदार झालेल्या जावळेंना तिसर्‍यांदा संसदेत जाण्याची संधी मिळाली असती तर नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाचीही संधी मिळाली असती, असे त्यांचे सर्मथक मानतात. उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी 25 टक्के गावांना भेटी दिल्या होत्या.