आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान ईद: मुस्लिम बांधवांची विश्वशांतीसाठी प्रार्थना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सामूहिक नमाज पठणासह एकमेकांना शुभेच्छा देत रमजान ईद साजरी झाली. भारत महासत्ता होण्याबरोबर विश्वशांतीची प्रार्थना मुस्लिम समाजबांधवांनी केली. तथापि, इस्राईलच्या वस्तूंवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचा ठराव ईदगाह ट्रस्टने केला. सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास सामूहिक नमाज पठणानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नेरी नाका जवळील ईदगाह मैदान, सुप्रीम कॉलनीतील ईदगाह मैदानावर नमाज अदा केली. नमाज सुरू होण्यापूर्वी इस्रायलमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला. ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष करीम सालार यांनी इस्रायलच्या वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचा ठराव मांडला. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तरुणांनी विदेशी व खासकरून इस्रायलच्या वस्तूंचा बहिष्कार व स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयीचे पोस्टरचे वाटप केले.
सामूहिक नमाज अदा
सुन्नी मुस्लिम बांधवांच्या सुप्रीम कॉलनीतील सुन्नी ईदगाह मैदानावर सकाळी 9.45 वाजता मौलाना फरीद रजवी यांच्या उपस्थितीत सामूहिक नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर खुतबा पठण केले. प्रार्थना करताना जगात विश्वशांती होऊ दे, भारताची सीमारेषा सुरक्षित राहू दे, भारत महासत्ता व बलशाली होवो अशी प्रार्थना बांधवांकडून करण्यात आली. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष अयाज अली, मौलाना नजमूल हक, मौलाना जुबेर आलम, मौलाना मुफ्ती रेहान, मौलाना अशरद आदी उपस्थित होते.
नमाजाची प्रक्रिया समजावली
मौलाना नसीर यांनी नमाजाची प्रक्रिया समजावून सांगितली. सचिव अमीन बादलीवाला यांनी अहवाल सादर केला. मौलाना उस्मान कासमी यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. आझादनगर, मलिकनगर, सालारनगर, कासमवाडी, मासुमवाडी, मणियारवाडा आदी भागातील तरुणांनी सहभाग घेतला.