आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोईटीतील बलात्कार प्रकरणाच्या तपासाला पोलिसांकडून वेग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शिरपूर तालुक्यातील भोईटी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील दोघे संशयित अल्पवयीन असल्याचा कांगावा कुटुंबीयांकडून होत आहे. त्यामुळे या दोघा संशयितांची एज डिटर्मेशन टेस्ट अर्थात वय पडताळणी चाचणी होणार आहे. बलात्कार प्रकरणात अशी चाचणी होण्याची धुळयातील ही पहिलीच वेळ आहे.

भोईटी या गावातील तेरावर्षीय मुलीवर बलात्कार झाला होता. त्यानंतर संशयित आरोपीच्या मदतीने सदर मुलीच्या घरी जाऊन वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी मंगळवारी (दि.24) सायंकाळी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर दोघा संशयितांवर शिरपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 376 (2)(एच), 341 (ब), 324, 323, 504, 34 तसेच बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सन 2012चे कलम 3, 4, 5 (एम) व 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पसार असलेल्या दोघांना शिरपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पाटील यांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान हे दोघेही अल्पवयीन असल्याचा कांगावा त्यांच्या कुटुंबीयांकडून होत आहे. यासंदर्भातील कागदपत्रे सोपवण्याबाबत पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना सांगितले ; परंतु अशिक्षितपणामुळे या दोघांचाही जन्म तसेच शैक्षणिक दाखला नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे या दोघांच्या वयाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी दोघांना धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक या दोघांची एज डिटर्मेशन टेस्ट अर्थात वय पडताळणी चाचणी करणार आहे. या चाचणीतून दोघा संशयितांच्या वयाचा अंदाज बांधता येणार आहे. यासंदर्भात धुळे जिल्हा रुग्णालयात संपर्क साधला असता अद्याप अशी चाचणी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, यात संशयितांचे वय कमी असल्याचे तसेच गुन्हा सिद्ध झाल्यास दोघांना बालगुन्हेगार कायद्यानुसार शिक्षा होईल.