आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलालांचा सुळसुळाट: रेशनकार्ड मिळवा दीड हजारात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- रेशनकार्डासाठी कायदेशीर सर्व बाबींची पूर्तता करूनही महिनाभरापर्यंत रेशनकार्ड मिळत नाही. मात्र, दुसरीकडे कागदपत्रे नसतानादेखील दीड हजारात त्वरित रेशन कार्ड तयार करून मिळत असल्याचा प्रकार सध्या तहसीलमध्ये सुरू आहे. एकप्रकारे दलालांना दीड हजार रुपये द्या आणि दोन दिवसांच्या आत रेशनकार्ड घेऊन जा, अशी योजनाच सुरू झाली आहे.

तहसील कार्यालयाने रेशनकार्ड वितरणात सूत्रबद्धता आणण्यासाठी महिन्यातील ठराविक दिवशीच रेशनकार्डाच्या कामाचे नियोजन केले आहे. यामुळे दलालांच्या कारवायांना चालना मिळाली आहे. बनावट रेशनकार्ड वितरित होऊ नये, यासाठी रेशनकार्डांसाठी आलेल्या अर्जांची तपासणी करण्यासाठी अनेक दिवस अर्ज तहसीलमध्ये पडून असतात. मात्र, दलालांकडून दीड हजार रुपयांत केवळ दोन ते तीन दिवसात रेशनकार्ड तयार करून दिले जात आहे. राजकीय वजन वापरुन दलालांनी आपले दुकान थाटली आहेत. तहसील कार्यालयातील अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्रातील कर्मचार्‍यांवर दबाव टाकून रेशनकार्ड आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली जाते. त्यानंतर बेकायदेशिररीत्या रेशनकार्ड बनवून घेतले जाते. अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्रातील काही कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. मात्र, दलाल राजकीय दबाव आणून बेकायदेशिर कामे करण्यास भाग पाडत असल्याचेही प्रकार समोर आले आहेत. परिणामी नियमाने सर्व कागदपत्रे देवूनही केवळ तपासणीचा फार्स असल्याने सर्वसामान्य नागरिक दलालांच्या फाशात अडकतात. दलालांना दीड हजार रुपये देवून रेशनकार्ड बनवून घेतले जाते. दलाल आणि काही कर्मचार्‍यांचे साटेलोटे असल्याने हा प्रकार अनेक महिन्यांपासून राजरोसपणे सुरू आहे. प्राथमिक स्थितीत रेशन दुकानदारांचा दाखला, सर्कल चौकशी, तलाठय़ांचा दाखला ही कामे दलालच मॅनेज करून घेतात. या प्रकारांची चौकशी झाल्यास तलाठी आणि मंडळाधिकार्‍यांचेही हात ओले होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गरजू लाभार्थ्यांना त्वरित रेशनकार्ड द्यावे
तहसील कार्यालयात रेशनकार्डांसाठी लाभार्थ्यांची होणारी पायपीट थांबविण्यासाठी तहसीलदारांनी पारदर्शक यंत्रणा राबवावी, केसरी शिधापत्रिकांवर शासकीय धान्य दुकानातून वेळेवर रेशनचे वाटप व्हावे, रॉकेलचे वितरण नियमित व्हावे, अशा मागण्यांचे निवेदन हिरामण रमेश मोरे, अजय खंडेराव, नरेश शिरसाठ, एस.आर.मोरे, विमल मोरे, विशाल मरसाळे, मोनू ब्राrाणे, दिलीप मरसाळे यांच्यासह 20 नागरिकांनी प्रांताधिकार्‍यांना दिले आहे. तसेच नागरिकांनी रेशनकार्डाचा लाभ घेण्यासाठी दलालांची मदत घेवू नये, अशा आशयाचे फलक तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहे. मात्र, तरीही येथे दलालांचा सुळसुळाट असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

तहसील कार्यालयाच्या आवारात लावले जनजागृतीपर फलक

दलालांचा बंदोबस्त करावा
तहसीलसारख्या कार्यालयात जर अधिकारी हे दलालांचे जरी ऐकत असतील तर ते चुकीचे आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे. नियमाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता केलेल्या लाभार्थ्यांना क्रमानुसार रेशनकार्डाचे वितरण केले पाहिजे. सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी दलालांची पाळेमुळे प्रशासनाने शोधली पाहिजे.
-संजय सावकारे, आमदार, भुसावळ

..तर थेट फौजदारी दाखल करू
रेशनकार्डसाठी लाभार्थ्यांनी दलालांच्या जाळ्यात अडकू नये. नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता करून रेशनकार्ड मिळवावे. तहसील आवारात दलाल आढळले तर त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतील. तहसीलमध्ये जर कोणाची रेशनकार्डांसाठी फसवणूक झाली असेल तर त्यांनी नि:संकोचपणे तक्रार द्यावी.
-वैशाली हिंगे, तहसीलदार, भुसावळ