आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीत सरळ लढत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी गटाकडून तरन्नूम इद्रिस, विजय चौधरी, अख्तर पिंजारी आणि पालकमंत्री गटातून युवराज लोणारी, तर भाजपकडून प्रमोद नेमाडे यांनी नामांकन दाखल केले होते. शुक्रवारी माघारीच्या दिवशी तरन्नूम इद्रिस, विजय चौधरी आणि भाजपचे प्रमोद नेमाडे यांनी माघार घेतली. यामुळे आता युवराज लोणारी आणि अख्तर पिंजारी यांच्यात सरळ लढत होणार आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लोणारींसह चार नगरसेवक, अपक्ष एक, खाविआचे आठ आणि भाजपचे 11 पैकी 9, असे एकूण 22 नगरसेवक लोणारींच्या बाजूने, तर चौधरींच्या गटाकडून राष्ट्रवादीचे 21, एक अपक्ष मिळून 22 नगरसेवक, असे प्राथमिक चित्र आहे. भाजपचे अजय भोळे आणि भावना पाटील हे तटस्थ राहतात किंवा कोणाला कौल देतात? यावर यशापयशाचे गणित अवलंबून आहे.
मॅजिक फिगर ‘24 ची’
भुसावळ पालिकेत एकूण 47 नगरसेवक आहेत. नगराध्यक्षपदासाठी निम्म्यापेक्षा जास्त म्हणजेच 24 मतांची आवश्यकता असते. दरम्यान, राष्ट्रवादीला समर्थन देणार्‍या मीना आघाडीच्या नगरसेविका जैबुन्नीसा रोषन अपात्र झाल्याने केवळ 46 नगरसेवक मतदानाचा हक्क बजावतील. असे असले तरी मॅजिक फिगर मात्र 24 ची असेल.
ईश्वर चिठ्ठीची शक्यता
नगरसेवकांचा कौल पाहता सद्य:स्थितीत संतोष चौधरी आणि पालकमंत्री सावकारे यांच्या गटात प्रत्येकी 22 नगरसेवक आहेत. मात्र, भाजपचे 11 पैकी दोन नगरसेवक तटस्थ राहिल्यास दोघांकडील संख्याबळ समसमान असेल. अशी स्थिती उद्भवल्यास ईश्वर चिठ्ठीद्वारे नगराध्यक्ष निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेत राष्ट्रवादीचे 25, भाजपचे 11, खाविआचे 8, अपक्ष 2 असे बलाबल आहे.
निवडणूक कार्यक्रम
शनिवारी पालिका सभागृहात सकाळी 9 ते 11 वाजेदरम्यान उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. यानंतर 11.05 वाजता नगराध्यक्षपदासाठी मतदानप्रक्रिया होईल. प्रांताधिकारी तथा पीठासीन अधिकारी विजय भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रभारी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या उपस्थित नगराध्यक्ष निवड झाल्यानंतर तत्काळ उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होईल.11.30 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे प्रभारी मुख्याधिकारी बाविस्कर यांनी सांगितले.