आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदी केली तरच मते; राष्ट्रवादीच्या मेळाव्यात महिलांची आक्रमक भूमिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दारूमुळे संपूर्ण गावे, कुटुंबे पोखरली गेली आहेत. स्वयंपाक केला तरी घास तोंडात जाईलच, याची खात्री नाही. सारे करून पाहिले, पोलिस गावात येतात नि हप्ते घेऊन जातात. निवडणुका आल्या की हातपाय जोडत तुम्हीही येतात; मात्र निवडून आल्यानंतर कुणीच फिरून पाहत नाही. तुम्हाला आमची मते हवी असतील तर आधी दारू बंद करा तरच तुम्हाला मते देऊ; अन्यथा सहकार्याची अपेक्षा सोडा, अशा शब्दांत ग्रामीण भागातील पीडित महिलांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे भावनांना वाट मोकळी करून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यात दारू बंद झाली पाहिजे; मात्र सरकार चालविण्यासाठी दारू विक्रीचे सर्मथन करणारे बबनराव पाचपुते यांचे भाषण सुरू असतानाच दारूमुळे पीडित काही महिलांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची दखल न घेतल्याने खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री देवकर यांच्या मतदारसंघातील (टाकळी) महिला उभी राहिली. गावातील दारूची व्यथा मांडत त्यांनी दारूबंदी करण्याची मागणी केली. त्यावर इतरही महिला पुढे सरसावल्या. हागणदारी, दारिदय़ रेषेखालील कार्ड आदी समस्या त्यांनी मांडल्या. दारू ही महिलांसाठी सर्वांत मोठी अडचण असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने ती सोडवावी, तेव्हाच आम्ही सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सुनावले. यावर खासदार सुळेंनी दारुबंदीबाबत पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांवर जबाबदारी सोपवली.

कायापालट झाल्याशिवाय पाय ठेवणार नाही
आई आणि मावशी यांच्या प्रेमात फरक असतो. मी कितीही केले तरी बारामतीची असल्याने जळगावचे प्रश्न मांडताना मावशीची भूमिका बजावू शकते. मात्र, मूळ प्रश्न सोडविण्यासाठी मला दोन खासदार द्या. विकासाची हमी मी देते. जळगावचा कायापालट झाल्याशिवाय पुन्हा जळगावला पाय ठेवणार नाही, असे ठाम आश्वासनही खासदार सुळे यांनी दिले.

..तर मते मागायला येणार नाही : एमआयडीसीतील पोलिस कॉलनी भागातील समस्या मांडणार्‍या महिलेने केवळ मतांसाठीच आमचा वापर होत असल्याचा आरोप केला. या वेळी तुमच्या भागात शौचालयांचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राष्ट्रवादीचा एकही पदाधिकारी मते मागायला येणार नसल्याची ग्वाही खासदार सुळेंनी दिली. जळगावचा चेहरा बदलण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचा ठराव त्यांनी मांडला.

यांची उपस्थिती : पालकमंत्री गुलाबराव देवकर, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, अमरावतीच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा ठाकरे, मंगला पाटील, प्रा.डॉ. अस्मिता पाटील, तिलोत्तमा पाटील, आरिफा खान, मंगला शिंदे, रिता बाविस्कर, पाचोर्‍याच्या साधना पाटील, पारोळ्याच्या वनमाला पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

मेळाव्याच्या माध्यमातून देवकरांचे शक्तिप्रदर्शन
पन्नास टक्के आरक्षणामुळे निवडणुकांपूर्वी विविध पक्षांचे राजकीय मेळावे शहरात सुरू झाले आहेत. त्यानिमित्त राजकीय पक्षांकडून महिलांची मांदियाळी जमवली जात आहे. तसेच येनकेनप्रकारे अधिकाधिक गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न मेळाव्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे. त्यास सोमवारचा राष्ट्रवादी कॉँग्रेसचा मेळावाही अपवाद राहिला नाही. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमुळे हा मेळावा गर्दी खेचणारा ठरला. सागर पार्क मैदानावर उत्कृष्ट नियोजनामुळे तीन तासांचा हा मेळावा निर्विघ्न पार पडला; मात्र एकाच वेळी मोठय़ा संख्येने वाहनांचा ताफा आल्याने आकाशवाणी चौक परिसरात वाहतूक ठप्प झाली होती.

भव्य व्यासपीठ : आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्षाचा हा पहिलाच मेळावा असल्याने त्यासाठी पक्षाने आयोजनात कोणतीही कसर ठेवली नाही. चारही बाजूंनी सुंदर फुलांनी सजवलेले पाच हजार स्क्वेअर फुटांएवढे रॅम्पचे भव्य व्यासपीठ मेळाव्याचे आकर्षण ठरले.

महिला आणण्याची पदाधिकार्‍यांवर जबाबदारी: उपस्थिती वाढवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्याला टार्गेट देण्यात आले होते. शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांसह महिला प्रतिनिधींवरही जबाबदारी टाकण्यात आली होती. बचत गटांच्या महिलांच्या पेहरावावरून त्यांना आणले गेल्याचे स्पष्ट जाणवत होते. त्यासाठी वाहनांची व्यवस्थाही पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून झाली. मेळाव्यास्थळी आणण्यासह परतीची व भोजन-भत्त्याची व्यवस्था असल्याने पहिल्यांदाच महिलांची मोठी संख्या मेळाव्यात दिसून आली.


दारूबंदी अशक्य
दारूबंदी ही चांगल्या समाजनिर्मितीसाठी आवश्यक असल्यामुळे अनेक समस्या निकाली निघतात. मात्र, काय करणार, सरकार चालवायचे म्हणजे पैसे लागतात आणि सर्वाधिक पैसे दारूच्या व्यवसायातून मिळतात. त्यामुळे दारूबंदी करणे अशक्य आहे.
-बबनराव पाचपुते, आदिवासी विकासमंत्री

महिलांकडे नेतृत्व
महिलांना दिलेली संधी आणि त्यांच्यातील क्षमता लक्षात घेता 2020मध्ये देशाचे नेतृत्व महिलांकडे असेल. सर्वांत मोठी निर्णायक मते महिलांचीच असतील. बचतगटांच्या माध्यमातून मोठे कार्य होत असल्याने त्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याची गरज आहे. आगामी काळात महिलांकडे नेतृत्व राहील, असा विश्वास आहे.
-अरुण गुजराथी, माजी विधानसभाध्यक्ष

सेनेला धडा शिकवावा
दिल्लीतील बलात्काराविषयी वायफळ बडबड करणारे सरसंघचालक मोहन भागवत यांचे डोके फिरले आहे. भाजप आणि आरएसएस ही कीड मिटविण्यासाठी दोघांनाही देशातून मुळापासून उपटून टाकण्याची गरज आहे. धार्मिक भांडणे लावण्याची कामे करणार्‍या शिवसेनेलाही आता धडा शिकवण्याची गरज आहे. म्हातारे होऊन आयुष्यभर जगण्यापेक्षा चारच वर्षे जिवंतपणे जगा.
-उषा दराडे, माजी प्रदेशाध्यक्षा