आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदे घेऊन, ताेरा मिरवूनही राष्ट्रवादी साेडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - जमिनीवरील कार्यकर्त्यांना नगरसेवक केले. शहराच्या प्रथम नागरिकाचा मान मिळवून दिला; परंतु पदांचा उपभोग घेऊन तोरा मिरवीत राष्ट्रवादी सोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा. पक्ष सोडून जाणाऱ्यांची चिंता करू नका. एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही, असा खंबीर आधार देत राष्ट्रवादीत सत्तेचा उपभोग घेऊन पक्षाला रामराम ठोकणाऱ्यांचा राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला. 
 
शहरातील राजर्षी शाहू नाट्य मंदिरात राष्ट्रवादीचा मेळावा शुक्रवारी सायंकाळी झाला. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवती सभेच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, प्रमोद हिंदुराव, शिवाजीराव पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे उपस्थित हाेते. या वेळी पुढे बाेलताना अजित पवार यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीला पक्षाच्या माध्यमातून सत्ता मिळते. त्यात त्याचे एकट्याचे परिश्रम नसते. त्यासाठी कोणी तरी कार्यकर्ता, नेता झटतो याचे भान ठेवले पाहिजे. अशा परिस्थितीत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विचलित होता पक्ष संघटनाचे काम सुरू ठेवले पाहिजे. आगामी कालावधीत राष्ट्रवादीचे ‘गाव तेथे शाखा आणि घर तेथे कार्यकर्ता’ या अनुषंगाने जोमात काम सुरू करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. सत्ताधारी सांगतात एक आणि घडते दुसरेच आहे. पाच वर्षे संपत येतील. मात्र, अद्यापही मुख्यमंत्री अभ्यास करतोय. समिती नियुक्ती केली जाईल, त्यानंतर कारवाई हाेईल, अहवाल यायचा बाकी अाहे. अहवाल पटलावर ठेवला जाईल. त्यानंतर कारवाईची प्रक्रिया हाेईल. बहुतांश प्रश्नांची उत्तरेही दिली जात नाही. चौकशी सुरू आहे अशा पद्धतीची पोरकट उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहेत. सरकार सामान्य नागरिकांच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण आणू पाहत आहे. मात्र, कोणी काय खावे, काय प्यावे हा त्यांचा घटनादत्त अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

या वेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी सांगितले की, हा दौरा काही निवडणुकांना लक्ष केंद्रित करून काढलेला दौरा नाही, तर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहोत. आलेली मरगळ झटकून कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करावी, पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करावे, पुढच्या वर्षी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्या दृष्टीने कामाला लागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पुन्हा सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात दौरा करून आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या महिलाध्यक्षा चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, संदीप बेडसे, यश कदमबांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महापौर कल्पना महाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्याेती पावरा, माजी आमदार रामकृष्ण पाटील, कैलास चौधरी, कमलेश देवरे, शिवाजीराव पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. 

आम्ही एकदाच निर्णय घेतला 
यूपीए सरकारच्या कालावधीत तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. हा निर्णय एकदाच घेण्यात आला. मात्र या सरकारने ३४ हजार रुपयांच्या कर्जमाफीसाठी आतापर्यंत तीन वेळेस शासन निर्णय बदलल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित यांनी या वेळी स्पष्ट केले. 

शासनाला जाब विचारणार 
शेतकरी कर्जमाफीचे निकष रोज बदलत आहेत. निर्णय घेऊन २५ दिवस उलटले तरी अद्याप एकाही शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. तसेच दहा हजारही मिळाले नाहीत. २४ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी याचा जाब विचारू, जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असे या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मेळाव्यात राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका करण्यात आली. शासनाची सर्व धोरण शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही या वेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी केला. 

गावांचे वाटोळे होईल 
आता सरकारने लोकनियुक्त सरपंच नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. गावात सदस्य एका गटाचे सरपंच दुसऱ्या गटाचा राहिल्यामुळे विकास कामांना खीळ बसणार आहे. त्यामुळे गावांचे वाटोळे होणार आहे. सध्या महापालिका, नगरपालिकांमध्ये त्याचे चित्र दिसून येत आहे, असा निर्णय आम्हीही घेतला होता. मात्र नंतर रद्द केला. 

शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याची शाई सुकली 
मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना तटकरे यांनी सांगितले की, मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे मंत्री, आमदार राजीनाम्याची धमकी देत हाेते. निवडणुका संपल्या मात्र, राजीनामे काही आले नाहीत. आता राजीनामा पत्राची शाईही सुकली आहे. 
राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बाेलताना अजित पवार उपस्थित. 
बातम्या आणखी आहेत...