आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याच्या दरासाठी रास्ता रोको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - व्यापार्‍यांमधील आपसातील मतभेदांमुळे शुक्रवारी कांद्याच्या खरेदी किमतीत तफावत आढळल्याने शेतकर्‍यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. तब्बल तीन तास रास्ता रोको व ठिय्या आंदोलन झाले. अखेर राजकीय पदाधिकार्‍यांच्या मध्यस्थीने दुपारी 3:30 वाजेला कांद्याचा लिलाव पूर्ववत सुरू झाला. दोन दिवस बाजार समितीत कांदा लिलाव बंद असल्याने शुक्रवारी कांद्याची आवक जास्त झाली. त्यामुळे व्यापार्‍यांनी कृतिमरित्या दर पाडल्याचा आरोप या वेळी झाला.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे सहा व्यापारी आहेत. या व्यापार्‍यांमध्ये आपापसात मतभेद असल्याने शुक्रवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी लिलाव सुरू करण्यात आले. दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी बाजार समितीत कांदा खरेदी सुरू झाली. दोन दिवस लिलाव बंद असल्याने मोठय़ा प्रमाणावर आवक झाली. यात काही व्यापारी 500 ते 700 रुपये प्रतिक्विंटल कांदा खरेदी करत होते. तर काही व्यापारी 2500 ते 3000 प्रमाणे कांदा खरेदी करत होते. शेतकर्‍यांना कांदा खरेदीतील ही तफावत लक्षात आल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी लिलाव प्रक्रिया बंद पाडली. त्यानंतर बाजार समिती समोर रास्ता रोको करण्याचा प्रय} केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने रास्ता रोको करण्यात अपयश आले. त्यानंतर किरण शिंदे बाजार समितीत दाखल झाले. त्यांनी शेतकर्‍यांशी चर्चा केली. तसेच परिस्थितीचे अवलोकन केले. त्यात व्यापार्‍यांच्या खरेदीत तफावत आढळल्याने त्यांनी शेतकर्‍यांना पाठिंबा दिला. दरम्यान शेतकर्‍यांनी मोर्चा बाजार समिती सभापतींच्या कार्यालयाकडे वळविला. सभापतींच्या कार्यालयासमोर पोलिसांनी शेतकर्‍यांना अडविल्याने शेतकर्‍यांनी जागेवरच ठिय्या मांडला. त्यानंतर पुढील दोन तासापर्यंत आंदोलन सुरूच होते. फेरलिलाव करून कांद्याला एकच भाव देण्यात यावा. तसेच सकाळी झालेल्या कांद्याचा नव्याने लिलाव करण्यात यावा, कृत्रिमरित्या एकाधिकारशाहीने कांद्याचे दर पाडणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी ठिय्या सुरू ठेवला. त्यानंतर काही राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीने लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आला.

पदाधिकार्‍यांचा भेदभाव
शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले असताना व्यापार्‍यांना खडसावून जाब विचारण्याची गरज असताना बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांनी व्यापार्‍यांचीच बाजू घेतली.कृत्रिमरित्या दरात घसरण होत असताना गुलाब कोतेकर या व्यापार्‍यांशी उद्या चर्चा केली जाईल, असे सांगितले. शेतकर्‍यांचा संताप अनावर झाल्याने अखेर व्यापार्‍यांना बोलावण्यात आले. दोन दिवसांपूर्वी लिलाव बंद झाला असताना कोतेकर यांनी शेतकर्‍यांना कांदा घरी घेऊन जा म्हणून सांगितले होते. व्यापार्‍यांमध्ये मतभेद असताना तसेच एकाच बाजारात दोन लिलाव सुरू असताना बाजार समितीचे पदाधिकारी हस्तक्षेप करीत नसल्याने शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला.

व्यापार्‍यांनी केली दंडेली
सध्या बाजार समितीत सहा कांदा व्यापारी आहेत. त्यात शुक्रवारी सकाळी सुरेश अग्रवाल, रुपचंद बजाज या व्यापार्‍यांनी कमी किमतीत कांदा खरेदी सुरू केली. तर त्याचवेळी प्रल्हादशेठ कापडणेकर यांनी शेतकर्‍यांना समाधानकारक दर दिले. ही बाब शेतकर्‍यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लिलाव बंद पाडला. दरम्यान त्या नंतर शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले. बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांनी व्यापार्‍यांना बोलावणे पाठविले. मात्र दीड तासापर्यंत व्यापारी जेवणाला गेल्याचे कारण पुढे करुन आले नाही. प्रतीक्षेनंतर व्यापारी दाखल झाले. त्यानंतर कापडणेकर यांनी लिलाव सुरू करण्यास होकार दिला. मात्र सुरेश अग्रवाल व रुपचंद बजाज यांनी लिलावाच्या ठिकाणी जाण्यास नकार दिला. त्या वेळी कुणाल पाटील, गुलाब कोतेकर, युवराज करनकाळ यांनी विनंती केल्याने हे दोन्ही व्यापारी लिलावस्थळी जाण्यास तयार झाले.

बाजार समितीत पाच दिवसांत दुसर्‍यांदा लिलाव बंद पाडण्यात आला. त्यानंतर शेतकर्‍यांच्या आंदोलनाला राजकीय रंग देत आंदोलन पेटवले गेले. ठिय्या आंदोलन सुरू असताना कुणाल पाटील, किरण शिंदे, गुलाब कोतेकर व युवराज करनकाळ यांची राजकीय चर्चा सुरू झाली. त्या वेळी संतप्त शेतकर्‍यांनी तुमचे राजकारण बाजूला ठेवा लिलावावर बोला, असे खडसावले. त्यामुळे हे पदाधिकारीही सुन्न झाले. हे चित्र योग्य नसल्याचे दिसून आले.