आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभक्त रेशनकार्डसाठी वणवण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- सरकारी तसेच खासगी कामासाठी लागणारा ओळखीचा पुरावा व इतर महत्त्वाच्या कामासाठी प्रत्येक नागरिकाला रेशनकार्डची आवश्यकता भासते. मात्र अनेक कुटुंबीयांना जीर्ण झालेले व विभक्त रेशनकार्ड दिले जात नसल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची गैरसोय होत असून त्यांना तहसील कार्यालयामध्ये दररोज हेलपाटे मारावे लागतात. ही वणवण थांबवावी या मागणीसाठी तालुका युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

रेशनकार्डसंदर्भात असंख्य तक्रारी शहरासह संपूर्ण तालुक्यातून होत आहेत. पुरवठा विभागाने नागरिकांची गैरसोय न करता जीर्ण झालेले व हरवलेल्या रेशनकार्ड तसेच विभक्त कार्ड देण्याची मागणी सर्वत्र वाढली आहे. अनेक कुटुंबीयांतील सदस्यांना विभक्त कार्डची गरज आहे. मात्र काही ठिकाणी एकाच कुटुंबात वास्तव्याला असूनही कुटुंबप्रमुख विभक्त कार्डची मागणी करताना दिसतात. तर काही कुटुंबातील सदस्यांची विभागणी झाल्यामुळे त्यांना स्वतंत्र रेशनकार्डची गरज भासते यासाठी पुरवठा विभागाने विभक्त कुटुंबीयांना नवीन रेशनकार्ड अदा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

अर्जांची संख्या जास्त
पुरवठा विभागाकडे रेशनकार्ड संदर्भात दररोज शेकडो अर्ज प्राप्त होत असतात. दर महिन्याला ही संख्या वाढत जाते. परिणामी सर्व प्रकारचे अर्ज तपासणी व नवीन कार्ड तयार करण्यासाठी काही कालवधी लागतो. त्यातच कर्मचारी संख्या अपूर्ण आहे. तरीही नागरिकांची होणारी अडचण लवकरच सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. बाबासाहेब गाढवे, तहसीलदार.

शेकडो अर्ज होतात दाखल
पुरवठा विभागात दररोज रेशनकार्ड संदर्भातले शेकडो अर्ज नव्याने प्राप्त होत असतात. मात्र अनेकवेळा त्रुटींमुळे हे अर्ज अनेक दिवस पडून असतात. कालांतराने असे अर्ज अनेकवेळा गहाळ झाले आहेत. पुन्हा नागरिकांना नव्याने खर्च करून अर्ज सादर करण्याची वेळ येत असते. नागरिकांना पुरवठा विभागाकडून योग्य मार्गदर्शन केले जात नसल्याचे युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनात म्हटले आहे.

वाळूचोरी सुरूच
तालुक्यात गौण खनिजाची चोरी पूर्णपणे थांबलेली नाही. कारवाई करूनही बिनधास्तपणे शहर व परिसरातून वाघडू, वाकडी येथून वाळूचा उपसा सुरू आहे. महसूल प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे युवक काँग्रेसचे सरचिटणीस नितीन राजपूत, राहुल मोरे, नितीन पाटील, अपी मिर्झा, शोएब शेख, राहुल जाधव, विजय पाटील यांनी केली आहे.

पुरवठा विभागात दररोज रांगा
शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना दररोज पुरवठा विभागात रेशनकार्डच्या चौकशीसाठी भाडे खचरून यावे लागते. पुरवठा विभागाच्या खिडकीत नागरिकांच्या सकाळपासून रांगा लागलेल्या असतात. अनेकवेळा कर्मचारी व नागरिकांमध्ये वाद होताना दिसतात. नवीन रेशनकार्ड, नाव कमी करणे, वाढविणे, जीर्ण झालेले कार्ड बदलविणे यासाठी स्वतंत्र कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली पाहिजे. मात्र दोनच कर्मचारी याठिकाणी काम पहात असतात. रेशनकार्ड हे प्रत्येक कुटुंबीयांना गरजेचे असल्यामुळे दररोज शेकडो अर्ज येथे प्राप्त होत असतात. यामुळे ही संख्या वाढत जाते.