आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशन दुकानात जाणाऱ्या धान्याची एसएमएसनेे दिली जाईल माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार एसएमएस गेटवे या सॉफ्टवेअरचा वापर करून रेशनकार्ड धारकांच्या मोबाइल क्रमांकावर धान्य गोदामातून रेशन दुकानात किती धान्य कधी पाठवण्यात आले याची माहिती दिली जाणार आहे. त्याची नुकतीच चाचणी घेण्यात आली.

गरीब नागरिकांना स्वस्तात धान्य मिळावे यासाठी शासनातर्फे राज्यभरात रेशन दुकाने सुरू करण्यात आली आहेत; परंतु रेशन दुकानातील धान्य अनेकदा काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे हे प्रकार बंद व्हावे यासाठी शासनातर्फे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून सर्व रेशनकार्ड आधार क्रमांकाशी लिंकिंग करण्यात येत आहे. त्याचबरोबर रेशन दुकानामध्ये बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोणत्या गोदामातून रेशन दुकानात किती धान्य पाठवले याची माहिती रेशनकार्ड धारकांच्या मोबाइवर एसएमएसने देण्यात येणार आहे. त्यासाठी एसएमएस गेटवे हे साॅफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. या साॅफ्टवेअरची सोमवारी चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी ठरली असून, डिसेंबरअखेर सर्व रेशन्कार्ड धारकांच्या मोबाइलवर एमएसएस पाठवण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक रेशन दुकानाच्या कार्यक्षेत्राच्या ५० ग्राहकांचा ग्रुप या सॉफ्टवेअरमध्ये तयार करण्यात आलेला आहे. धान्य गोदामातून धान्य वितरित झाल्यानंतर वाहनाचा क्रमांक, दिनांक, वेळ, वाहनात असलेला एकूण माल, मालाचा प्रकार, रेशन दुकानाचा क्रमांक आदी माहिती ग्राहकांच्या नंबरवर एसएमएसद्वारे पाठवण्यात येणार आहे.
एसएमएसमुळे आता सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.
बहुतांश वेळेस रेशन दुकानात धान्य उपलब्ध असताना ग्राहकांना दुकानदारांकडून ते दिले जात नाही. हा प्रकार आता बंद होणार आहे.

काळ्या बाजाराला लागणार चाप
रेशन दुकानातून अनेक वेळा ग्राहकांना वेळेवर धान्य मिळत नाही. त्याचबरोबर काही वेळा धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जाते. त्यामुळे या प्रकारांना चाप लावण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. रेशन दुकानदारांची बैठक घेण्यासह त्यांना दुकानामध्ये फलक लावण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर गोदामातून धान्याची उचल केल्यानंतर धान्याचे योग्य पद्धतीने वितरण करण्याचे आदेश दिले गेले आहे.

गोडाऊन किपरवर जबाबदारी
एसएमएस पाठवण्याची जबाबदारी ही गोडाऊन किपरवर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी गोडाऊन किपरला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. काही धान्य गोदामामध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे गोडाऊन किपरला माहिती तहसील कार्यालयात सादर करावी लागेल. तसेच या ठिकाणावरून एसएमएस पाठवावे लागतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात ९८५ रेशन दुकाने
जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यात ९८५ रेशन दुकाने असून, प्रत्येक दुकानातील ५० ग्राहकांचा ग्रुप तयार करून त्यांना एसएमएस पाठवण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने पन्नास जणांच्या ग्रुपची मर्यादा वाढवण्यात येणार आहे. जिल्ह्यात अाठ धान्य गोदाम आहेत. त्यात धुळ्यात एक, साक्री शिरपुरात प्रत्येकी दोन, शिंदखेडा तालुका तीन गोदामांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...