आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिधापत्रिका गैरप्रकाराला आता तहसीलदार जबाबदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मुख्यमंत्र्यांसह बड्या व्यक्तींच्या नावाने शिधापत्रिका काढल्याचे प्रकार घडल्यानंतर अचानक वितरणात झालेल्या वाढीमुळे राज्य शासनाने आता कारवाईचा दंडुका हाती घेतला आहे. तहसील कार्यालयात येणार्‍या कोर्‍या शिधापत्रिकांच्या काळ्या बाजाराला लगाम लावण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पत्रिकांचा गैरवापर झाल्यास थेट तहसीलदारांसह संबंधितांना जबाबदार धरण्यात येणार आहे.

शिधापत्रिकांच्या वितरण व्यवस्थेतील गलथान कारभारामुळे प्रशासनाला कायम मान खाली घालण्याची वेळ आली आहे. याबाबत विधानसभेतही आवाज उठवले गेले. राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये केशरी शिधापत्रिकांच्या वितरणात अचानक वाढ झाली. त्यामुळे गेल्या वर्षी शासनाने शिधापत्रिकांचा काळाबाजार रोखण्याचे निर्देश दिले होते.
कोर्‍या शिधापत्रिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तहसीलदार तसेच शिधापत्रिका अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली होती. तसेच कोर्‍या शिधापत्रिकांचा ताळमेळ ठेवण्यासाठी दर महिन्याला आढावा घेण्याचे आदेश दिले होते. परंतु असे असतानाही पुणे जिल्ह्यात शिधापत्रिकांची विक्री काळ्या बाजारात होत असल्याबाबत विधान परिषदेत प्रश्‍न उपस्थित केला गेला होता. त्यामुळे आता शिधावाटप कार्यालयातून कोर्‍या शिधापत्रिका गहाळ झाल्याचे अथवा त्यांचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्यास तहसीलदार, अन्नधान्य वितरण अधिकारी, शिधावाटप अधिकारी, संबंधित कर्मचार्‍यांना थेट जबाबदार धरण्यात येणार आहे.