आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raver Assembly Constituency, Latest News In Divya Marathi

शेतीपूरक उद्योगांसह रस्त्यांचा विकास हाच मुद्दा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर- रावेर विधानसभा मतदारसंघात एकूण 15 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये दोन उमेदवार लेवा समाजाचे तर माळी, मुस्लिम आणि मराठा समाजाचा प्रत्येकी एक उमेदवार भाग्य आजमावत आहेत. या मतदारसंघात जातीपातीची समीकरणेही निर्णायक ठरल्याचा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे निर्णायक आघाडी कोण घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. रावेर शहराचा खुंटलेला विकास, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, रोजगाराचा प्रश्न, शेती मालावर आधारित प्रक्रिया उद्योग आदी मुद्दे सर्व उमेदवारांनी उचलून धरले आहेत.
भाजपतर्फे माजी खासदार हरिभाऊ जावळे तर काँग्रेसतर्फे आमदार शिरीष चौधरी यांनी उमेदवारी दाखल केली आहे. युती तुटल्यानंतर शिवसेनेने प्रल्हाद महाजन यांना रिंगणात उतरवले आहे, तर राष्ट्रवादीतर्फे गफ्फार मलिक मनसेतर्फे जुगल पाटील लढत आहेत. मात्र, काट्याची लढत भाजपचे हरिभाऊ जावळे आणि काँग्रेसचे शिरीष चौधरी यांच्यातच होण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेचे उमेदवार किती प्रभाव पाडतात, यावरच विजयी उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे.
शिवसेना शिवसेनेचेउमेदवार प्रल्हाद महाजन यांनी विकासाच्या प्रक्रियेत शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर यांच्या मूलभूत समस्या सोडवण्याचा मुद्दा प्रचारासाठी पुढे केला आहे. शिक्षण, रोजगार, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, सिंचन यांच्याशी निगडित समस्या सोडवण्याला प्राधान्य देणार असल्याचे ते मतदारांना सांगत आहेत.

मनसे शेतीसहरस्त्यांच्या विकासावर मनसेचे उमेदवार जुगल पाटील यांनी भर दिला आहे. तसेच यावल सूतगिरणी सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही मुद्दा पाटील यांनी पुढे केला आहे. रावेर विधानसभा क्षेत्रातील रावेर आणि यावल शहरात अधिकाधिक उद्योगधंदे आणण्यावर मनसेचा भर असणार आहे, असे सांगितले जात आहे.
भाजप विकासाचीगती वाढवण्यासाठी रावेर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीला वाय-फाय सुविधा देण्याचे आश्वासन हरिभाऊ जावळे युवा मतदारांना देत आहेत. खासदारकीच्या कार्यकाळात केलेल्या कामांचाही आढावा घेतला जात आहे. शेतकऱ्यांना करपा पॅकेज मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न, हॉर्टिकल्चर ट्रेन सुरू करण्यासाठी केलेला पाठपुरावा, हे मुद्दे ते मतदारांना आवर्जून सांगत आहेत. केळी पीक विमा योजनेत सुधारणा करण्यासोबत कृषी पर्यटनाला चालना देण्याचा मुद्दा भाजपने उचलला आहे.
राष्ट्रवादी राष्ट्रवादीचेउमेदवार गफ्फार मलिक यांनी प्रचारात युवा मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. शिक्षण, रोजगार आरोग्याच्या सोयी हाच राष्ट्रवादीच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राष्ट्रवादीचे योगदान स्पष्ट करून सांगितले जात आहे. रावेर आणि यावल तालुक्यांमधील धरणांचे पाणी कोरडवाहू भागात पोहोचवून अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडला जात आहे.

काँग्रेस आपल्याकार्यकाळातील विकासकामांसह रावेर-यावल तालुक्यांच्या प्रशासकीय इमारती, क्रीडा संकुले, धान्य गोदामे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील नवीन आभ्यासक्रम, तीर्थक्षेत्र विकास, पर्यटन विकासासाठी आणलेला निधी हे अामदार शिरीष चौधरींच्या प्रचाराचे मुद्दे आहेत. रावेरसह पाल येथे एमआयडीसी उभारणी, कृषी पूरक प्रक्रिया उद्योगांना चालना, रोजगार निर्मिती, शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न, मोर धरणावर सौर ऊर्जा प्रकल्प असे मुद्देही मांडले जात आहेत.