आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी असूनही रावेरात उद्योगधंद्यांचा अभाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर - महाराष्ट्राच्या उत्तर-पूर्वेकडील शेवटच्या टोकाला आणि मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेला रावेर तालुका केळीमुळे संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. तालुक्याचे मुख्यालय रावेर शहर असल्याने कृषी आधारित आणि लहान-मध्यम उद्योगांचे जाळे निर्माण होवू शकते. या माध्यमातून शेकडो बेरोजगार हातांना काम मिळू शकते. मात्र, जबाबदार लोकप्रतिनिधी आणि शासकीय पातळीवर हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचे भिजत घोंगडे अजूनही कायम आहे. तरीही शासनाच्या मदतीविना येथील भूमिपुत्रांनी उद्योग उभारुन तालुक्याच्या वैभवात भर घातली आहे.

रावेर शहर परिसरात उटखेडा रोडलगत औद्योगिक वसाहत निर्माण होवू पाहत आहे. या भागात शासनाने एमआयडीसीच्या अनुषंगाने सुविधा निर्मिती केल्यास नवीन उद्योगांची उभारणी होईल. उद्योजकांना प्रेरणा मिळेल. 15 ते 20 वर्षांपूर्वी रोजगारासाठी वेस्टर्न महाराष्ट्र विकास मंडळाकडून रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली. याचा लाभ घेत तालुक्यातील काही भूमिपुत्रांनी जागा मिळवून उद्योग थाटले. ठिबक संच, पीव्हीसी पाइप, बुट कंपन्या व अन्य काही असे 15 ते 20 उद्योग भरभराटीस आले आहेत. हे उद्योग उभारणी करताना शासनाने उद्योजकांना अजून सुलभ दराने जागा, पायाभूत सुविधांची निर्मिती करून दिल्यास केळीबेल्टची उद्योगधंद्यांचा परिसर म्हणून नवीन ओळख तयार होईल.

दरम्यान, रावेर शहराबाहेर औद्योगिक वसाहत बनू पाहणार्‍या या परिसरात वैष्णवी इरिगेशन, साईराम प्लास्टिक, सरस्वती इरिगेशन, तिरुपती अँग्रो प्लास्ट, र्शीराम अँग्रो प्लास्ट, साईनाथ इरिगेशन, गायत्री इरिगेशन, शीतल प्लास्ट, महालक्ष्मी स्टोन क्रशर व स्टाइल कंपनी, गुलशन बर्फ कारखाना, भूषण ऑइल, राज प्लास्टिक या कंपन्या जोमाने सुरू आहेत. मात्र, यापैकी बहुतेक उद्योग खासगी जागेमध्ये आहेत. अजूनही इतरांची उद्योग सुरू करण्याची तयारी असली तरी जागेची अडचण कायम आहे. शेती विकत घेण्यासाठी प्रचंड भांडवल गुंतवणूक करावी लागेल. शिवाय सुविधा निर्मितीसाठीही खर्च करावा लागेल.
दिलीप अग्रवाल यांचा सन्मान - दिलीप अग्रवाल यांनी तिरुपती प्लास्टच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात चांगल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेवून जिल्हा उद्योग केंद्राने त्यांना सन 2010 चा लघु उद्योजक पुरस्कार घोषित केला आहे. त्यामुळे रावेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. दिलीप अग्रवाल यांना यापूर्वीही औद्योगिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाले आहेत.
मनोहर पाटलांचे असेही प्रयत्न - पातोंडी येथील शेतकरी कुटुंबातील मनोहर पाटील यांनी स्वबळावर वैष्णवी इरिगेशन उद्योग उभारला. परिसरातील शेतकर्‍यांना रास्त किमतीत टिकाऊ ठिबक मिळावे म्हणून वेगवेगळे प्रयोग केले. त्यात त्यांना कधी यश, तर कधी अपयश आले. मात्र, जिद्दी व मेहनती स्वभावामुळे त्यांना यश मिळवून दिले. पाणी व्यवस्थापनात शेतकर्‍यांना अजून काय बदल करता येतील, यासाठी त्यांची धडपड आठ वर्षांपासून फळाला आली आहे. इरिगेशन क्षेत्रात प्लॅट इरिगेशन यंत्र तयार करून त्यांनी शेतकर्‍यांसाठी एक महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. यातून केळी उत्पादकांना रास्त किमतीत व दर्जेदार ठिबक मिळणे शक्य होईल. यासाठी पाटील यांनी दोनवेळा चीनमधील शांघाय व बिजिंगला भेट देवून आपला ड्रीम प्रोजेक्ट यशस्वी केला आहे. त्यांच्या या शोधातून शेतकर्‍यांचा वेळ व चॉकअप होणार्‍या नळ्यांची झंझटच दूर होणार आहे. पूर्वीच्या गोल ड्रीपच्या नळीऐवजी जास्त काळ टिकणारी पट्टी ड्रीपर रास्त किमतीत मिळणार आहे.
आमदारद्वयींचे प्रयत्न कायम - रावेरमध्ये एमआयडीसी व्हावी, यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी अधिवेशनात प्रयत्न केले होते. मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार मनीष जैन यांनी रावेर, सावदा आणि यावल औद्योगिक वसाहतींचा विकास करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीस चालना द्यावी, अशी मागणी तारांकित प्रश्न उपस्थित करून केली होती. राज्यमंत्री सचिन अहिर यांनी या प्रश्नी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय एमआयडीसीचे डायरेक्टर के.शिवाजी यांच्याकडेही आमदार जैन यांनी पत्रव्यवहार केला होता.
रावेरमध्ये प्रचंड संधी - रावेरमध्ये एमआयडीसीचा विकास झाल्यास उद्योगधंदे वाढीसाठी प्रचंड संधी आहेत. मात्र, जागा नसल्याने इच्छा असूनही उद्योगधंदे उभे राहत नाहीत. काही कारखाने असले तरी त्यांना खासगी जागेचा आधार घ्यावा लागला. सरकारने जागा उपलब्ध करून दिल्यास रोजगार निर्मिती शक्य आहे. यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न व्हावेत. र्शीराम पाटील, यशस्वी उद्योजक, रावेर