आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raver Municpal Corporation President & Member To Meet Chif Minister Pruthviraj Chavan

मुख्यमंत्र्यांकडून रावेरकरांच्या पाठीवर कौतुकाची थाप !

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना काहीसे अस्थिर करत कॉँग्रेसने तालुक्यात कमबॅक केले. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये एकूण चार जागा जिंकल्या. रावेर पालिका पक्षाच्या चिन्हावर लढून सर्वाधिक सात सदस्य विजयी झाले. कॉँग्रेसचा नगराध्यक्ष झाला. याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कौतुक केले. नवनिर्वाचित सदस्य, नगराध्यक्ष दारा मोहंमद यांच्यासह आमदार शिरीष चौधरी यांनी नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी गौरवोद्गार काढले.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पंचायत समिती सदस्य पंकज महाजन (रोझोदा), हसीना गुलाब तडवी (वाघोदा), जनाबाई गोंडू महाजन (पाल गण) यावल तालुक्यातील बामणोद गणातील सदस्य विलास तायडे, लिलाधर चौधरी, जिल्हा परिषद सदस्या पुष्पा तायडे, प्रभाकर सोनवणे, रावेरचे नगराध्यक्ष दारा मोहंमद, गोपाळ बिरपन यांच्यासह आमदार शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेतली. निवडणुकीचा आढावा सादर करताना यावल-रावेर तालुक्यात पक्षाच्या उंचावलेल्या कामगिरीची माहिती दिली. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हातून नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, आ. गं. हायस्कूलचे शिक्षक प्रकाश तायडे, विजय तायडे, अशोक शिंदे उपस्थित होते. कॉँग्रेसच्या चिन्हावर विजयी झालेल्या सर्व सदस्यांच्या भागामध्ये विकासकामांसाठी सहकार्य करू, असे आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले. दरम्यान, चिनावल-खिरोदा गटातील कॉँग्रेसच्या पुष्पा तायडे या चिनावल येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षिका आहेत. त्यांनी गणातील पंचायत समिती सदस्यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना आमदार शिरीष चौधरी यांनी दिल्या.
विकासासाठी मदत मिळेल
मुख्यमंत्र्यांनी शहराच्या, तालुक्याच्या विकासासाठी दिलेला शब्द आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या भेटीमुळे मनस्वी समाधान झाले. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हातून झालेला सत्कार अविस्मरणीय आहे.
-दारा मोहमंद जाफर मोहमंद, नगराध्यक्ष, रावेर
जनतेचा विश्वास संपादन करण्यात यश आले. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हातूनच सत्कार झाल्याने वेगळाच आनंद मिळाला. तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी यांच्या पुढाकाराने हा योग जुळून आला.
-पुष्पा तायडे, जिल्हा परिषद सदस्या, रावेर